३०५८ घरे डास अळी दुषित, आरोग्य विभागाचे सर्वेक्षण
गोंदिया (Gondia Health Survey) : जिल्ह्यात हिवताप, डेंग्यूच्या रूग्णात वाढ होत आहे. यामुळे किटकजन्य आजारावर आळा बसावा, याकरीता आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जाते. यानुसार जिल्ह्यातील १११६ गाव व शहरी भागात आरोग्य यंत्रणेकडून किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. यातंर्गत घर, पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १११६ गावांपैकी २२ गावांना किटकजन्य आजाराचा धोका असल्याचे समोर आले आहे. तर ३०५८ घरे डास अळी दुषित आढळून आली. यामुळे नागरिकच किटकजन्य आजाराला निमंत्रण देत आहेत, असे (Gondia Health Survey) सर्वेक्षणात समोर आले आहे.
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया बाधित रुग्ण आढळल्यानंतर हिवताप विभाग आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा (Health Department) सतर्क झाली आहे. या आजारांना निमंत्रण देणारे स्त्रोतांचा शोध घेवून नष्ट करयासाठी जिल्ह्यातील यंत्रणेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका यांच्यासह किटकशास्त्रीय सर्वेक्षणासह पाणीसाठ्यांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील १११६ गावात (Health Department) आरोग्य विभागाच्या चमुतर्फे ही मोहिम राबविली जात आहे. यामध्ये जिल्हा आरोग्य विभागामार्फत १ लाख ४६ हजार ७६६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ३०५८ घरे डास अळी दुषित आढळली असून जिल्ह्यातील २२ गावांमध्ये घर, पाणीसाठे, कुंड्यांमध्ये हिवताप, चिकुनगुनिया, डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे २२ गावांना किटकजन्य आजाराचा धोका असल्याचे समोर आले आहे.
३७६१६७ पाणी साठ्यांची तपासणी
आरोग्य यंत्रणेकडून हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी किटक सर्वेक्षण करण्यात आले. हे (Gondia Health Survey) सर्वेक्षण जिल्ह्यातील १११६ गावांमध्ये ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत करण्यात आले. यामध्ये आरोग्य विभागाच्या चमुने १ लाख ४६ हजार ७६६ घरी भेटी दिल्यात. या सर्वेक्षणात ३ लाख ७६ हजार १६७ पाणीसाठ्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४१९५ पाणीसाठे दुषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खबरदारी व उपाययोजना म्हणून जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत ३ हजार ३८८ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले असून किटकनाशक फवारणी केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त आहे.
पावसाळा अद्यापही सुरु आहे. हिवताप, डेंग्यूंच्या डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. त्यासाठी घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसे झाल्यास किटकजन्य आजांरावर बर्यापैकी नियंत्रण मिळविला येणार, याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
– डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया