मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार
नरखेड (Mowad Health Centre) : डॉक्टरकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार शुक्रवारी नरखेड तालुक्यातील मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Mowad Health) घडला. एक महिला मृत्यूशी लढत असताना कर्तव्यावर असलेला आरोग्य अधिकारी दारूच्या नशेत तल्लीन होऊन शासकीय निवासस्थानी पडला होता तासाभराने बेलोना येथील डॉक्टरांनी येऊन रुग्णावर प्राथमिक उपचार करून नागपूर हलविले.
बजरंग दल युवकांनी केला पर्दापाश
यामुळे मोवाड येथे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ, मयूर बोपचे यांच्याकडे या केंद्राचा कारभार असून डॉ. प्रवीण उमरगेकर हे दुसरे वैद्यकीय अधिकारी आहेत दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या सोयीने तीन तीन दिवस ड्युटी करतात. शुक्रवारला डॉ, प्रवीण उमरगेकर यांची ड्युटी होती. मोवाड वार्ड क्रमांक ३ येथील एक २८ वर्षीय विवाहित महिलेला सकाळी ११ वाजता दाखल केले होते. त्यावेळी डॉ, प्रवीण उमरगेकर हे त्यांच्या निवासस्थानी दारूच्या नशेत तल्लीन अवस्थेत पलंगावर पडले होते.
संतप्त नागरिकांनी व बजरंग दल युवकांनी पोलिसांना पाचारण केले. परंतु डॉ, उमरगेकर हे त्यांच्या निवासस्थानात असल्यामुळे हतबलता दाखविली हा प्रकार डॉ, बोपचे यांना समजतात त्यांनी बेलोना येथे कार्यरत डॉ, प्रतीक राऊत यांना १२ वाजता मोवाड जाण्याचे निर्देश दिले. १५ मिनिटात डॉ,राऊत यांनी मोवाड येथे पोहोचून पीडित महिलेवर उपचार केले. डॉक्टर यांच्यावर योग्य ती कार्यवाही होऊन त्यांना निलंबित करण्याची मागणी बजरंग दल युवकांनी लावून धरली आहे.