परभणी (Parbhani): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सतत जनजागृती केली जाते. शासकीय(Govt), निमशासकीय कार्यालयात एखाद्य कामासाठी लोकसेवकाकडून आडवणूक केली जात असेल तर तक्रार करण्याचे आवाहन केले जाते. मात्र नोकरशाहीतील लाचखोर एवढे निर्ढावले आहेत की, त्यांना कशाचेही भय राहिले नाही. सर्रास लाचेची मागणी केली जाते. परभणी जिल्ह्यात १ जानेवारी ते २३ डिसेबर या वर्षभरात १३ सापळे लावण्यात आले.
जिल्ह्यात १ जानेवारी ते २३ डिसेबर या वर्षभरात १३ सापळे लावण्यात आले
शासकीय नोकरदारांना लाखाच्या घरात पगारी आहेत, मात्र तरीही लोकसेवकांना चिरीमिरीचा मोह आवरता येत नाही. शासकीय कार्यालयात (Government offices) कोणतेही काम संबंधित अधिकारी, कर्मचार्यांना निर्धारित वेळेत पूर्ण करावे लागते. मात्र काही लाचखोर अधिकारी, कर्मचारी जाणिवपुर्वक काम प्रलंबित ठेवतात. लवकर काम करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. यातूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होते. आज संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयात कोणतेही काम सहजासहजी होत नाही. चिरीमिरी द्यावीच लागते. आर्थिक पिळवणूक होऊनही तक्रार करायला कुणी पुढे येत नाहीत. त्यामुळे लाचखोरांचे मनोबल वाढत आहे. गेल्या वर्षभरात १ जानेवारी ते २३ डिसेंबरच्या अहवालावर दृष्टीक्षेप टाकला तर लक्षा येईल की लाचखोर किती मुजोर झाले आहेत.
लाच मागणार्या ८ जणावर निलंबनाची कारवाई
राज्यात ६६५ गुन्हे वर्षभरात दाखल झाले आहेत. यात नांदेड परिक्षेत्रातच ५७ गुन्हे नोंद आहेत. यात नांदेड जिल्ह्यात १९, परभणी जिल्ह्यात १३, लातूर जिल्ह्यात १४ आणि हिंगोली जिल्ह्यात ११ सापळे असे एकुण ५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जानेवारी, मार्च, एप्रिल, मे आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्येक एक अशी कारवाई केली आहे. फेब्रुवारी महिन्यात ३, जून आणि डिसेंबर महिन्यात प्रत्येकी दोन कारवाया केल्या आहेत. यात लाच मागणार्या ८ जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संभाजी नगर परिक्षेत्रात जवळपास १०९ कारवाया करण्यात आल्या आहेत. या आकडेवारीवरुन राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. विशेषत: महसूल, महावितरण आणि नगरविकास परिवहन विभागात अधिक प्रमाण आहे.