१४ उमेदवार निवडणूक रिंगणात; अपक्ष उमेदवार आणणार रंगत
पाथरी (Pathari Assembly Election) : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाथरी विधानसभा मतदारसंघात होणार्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून यावेळी बहुरंगी लढत होणार असून तगडे अपक्ष उमेदवार निवडणुकीमध्ये रंगत आणणार आहेत.
पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये (Pathari Assembly Election) छाननीनंतर ४७ उमेदवार रिंगणात होते .उमेदवारी अर्ज व मागे घेण्याच्या सोमवार ४ नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वा पर्यंत यातील ३३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले . यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडून निवडणूक लढविणाण्यास इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे .जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पाथरी विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष आहे.
यावेळी २०१४ झालेल्या निवडणुकीची (Pathari Assembly Election) आठवण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी कडून काँग्रेस पक्षाचे आ.सुरेश वरपुडकर, महायुतीतील घटक पक्ष राकाँ (अजीत पवार) पक्षाकडून आ.राजेश विटेकर , रासप चे सईद खान, वंचित बहुजन आघाडीचे इंजि. सुरेश फड पक्षीय उमेदवार निवडणूक रिंगणात असून अपक्षांमधून माजी आ. बाबाजानी दुर्राणी व माजी आ. मोहन फड यांचे वडील माधवराव फड हे तगडे अपक्ष उमेदवार या लढतीमध्ये असल्याने ही लढत यावेळी रंगतदार होणार आहे, असे स्पष्ट झाले आहे.
याशिवाय इतर आठ उमेदवार मैदान गाजवण्यासाठी तयार असणार आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेनंतर सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले असून मंगळवार ५ नोव्हेंबर पासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४ उमेदवार शिल्लक राहिल्याने यावेळी प्रत्येक बुथवर एकच बॅलेट युनिट असणार आहे. त्यामुळे प्रशासनाचीही डोकेदुखी कमी झाली आहे .