लातूर(Latur) :- गेल्या अनेक महिन्यांपासून लातूर शहर महापालिकेचा कारभार प्रशासकाकडे आहे. त्यामुळे या कारभाराची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारकडे जाते, असा पलटवार माजी मंत्री आ. अमित देशमुखांनी महायुती सरकारवर केला.
नागरी असुविधांचा थेट राजकारणाशी संबंध जोडणाऱ्यांवर आ. अमित देशमुखांचा पलटवार
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरांमध्ये नागरी सुविधांचे धिंडवडे निघाले. याबाबत आ. देशमुख यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसोबत आढावा बैठक घेतली. महापालिकेसंदर्भातील अनेक बाबी आज निदर्शनास आणून दिल्या. त्यात तात्काळ सुधारणा करण्यात येतील, असे महापालिका (Municipality) प्रशासक तथा आयुक्तांनी सांगितल्याची माहिती माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत(Press conference) दिली. शहरातील नागरी असुविधांचा थेट राजकारणाशी संबंध जोडणाऱ्यांना देशमुखांनी हे उत्तर दिले. लातूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनियमित घंटागाडी, नाल्या तुंबलेल्या, रस्त्यावर पाणी, रस्त्यावरचे खड्डे, वाहतुकीची कोंडी कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी आणि त्यामुळे मागच्या काळात निर्माण झालेला डेंगूचा प्रादुर्भाव या बाबींवर महापालिकेने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना या आढावा बैठकीत आपण दिल्याचे आमदार देशमुख म्हणाले.
शहराला मागच्या काही काळात गाव भागामध्ये गढूळ पाणीपुरवठा
लातूर शहराला मागच्या काही काळात गाव भागामध्ये गढूळ पाणीपुरवठा (Water supply)झाला. आता मांजरा धरणामध्ये पाणीसाठा निर्माण होत असून शहराला पाच दिवसाला पाणी सोडले जात आहे. त्यात नियमितता पाळण्याची सूचना आपण केल्याचे ते म्हणाले. शहरात अनेक भागात अनधिकृत गुंठेवाडीचे परवाने दिले आहेत. याबाबत आयुक्तांनी चौकशी करावी. लातूर महानगरपालिकेचा भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा नावलौकिक राखावा, अशी अपेक्षाही आपण व्यक्त केल्याचे देशमुख म्हणाले. लातूर शहरांमध्ये चौका चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. ती अतिक्रमणे हटवावी. तसेच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांशी समन्वय राखून तात्काळ उपाययोजना कराव्यात, असेही आढावा बैठकीत आपण सांगितल्याचे ते म्हणाले.
शहरात बांधकाम परवाने दिले जात असताना बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक
शहरात बांधकाम परवाने (Building Permits)दिले जात असताना बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. परवाना एका कामाचा व बांधकाम दुसरेच केले जात आहे. अनेक व्यापारी संकुले बांधताना त्याच्या पायऱ्या इंच इंच लढून रस्त्यालगत केल्या जात असल्याने शहरात पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. विकासकांनी अशा चुका करू नये व त्यात महापालिकेनेही लक्ष घालावे, असेही आमदार देशमुख म्हणाले. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, बाजार समिती सभापती जगदीश बावणे, समद पटेल, कैलास कांबळे सचिन बंडापल्ले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.