Buldhana:- पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण (Abduction)करण्यात आलेल्या येथील दिलीप भिकाजी इंगळे रा जानेफळ या युवकाचा २४ जुन रोजी कुजलेल्या अवस्थेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नजिक मृतदेह (Deadbody)मिळाल्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून तपास सुरू केला असता पैशाच्या व्यवहारातील कारणातून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (beating)केल्यामुळे यात दिलीप इंगळे याचा मृत्यू (Death) झाल्याची कबुली आरोपींनी दिल्याने आज दि.१२ जुलै रोजी जानेफळ पोलिसांनी या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्याची वाढ केली असून अटकेत असलेल्या ५ आरोपींना मेहकर न्यायालयात आज दि.१२ जुलै रोजी हजर करण्यात आल्यानंतर त्यांची १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
कट रचून पूर्व नियोजन करून जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण
जानेफळ तालुका मेहकर येथील इंदिरानगर भागात राहणाऱ्या सौ. ज्योती दिलीप इंगळे या महिलेने जानेफळ पोलीस स्टेशनला(Police Station) तक्रार देऊन माझा पती दिलीप भिकाजी इंगळे वय ४४ वर्ष याला दि. २२ जून रोजी दुपारी अमोल जयसिंग राजपूत व इतरांनी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी घरुन नेले होते असे तक्रारीत नमूद केले होते. आणि कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा नगर येथून त्यांना कट रचून पूर्व नियोजन करून जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आल्याचे नमूद केल्याने जानेफळ पोलिसांनी या प्रकरणी दि.९ जुलै रोजी अपराध नंबर २०४/०२४ कलम ३६५, ३६४, १२० ब, ३४ भावी नुसार गुन्हे दाखल करून जानेफळ तालुका मेहकर येथील संदीप सुभाष शेवाळे व योगेश रमेश तोंडे तसेच सातारा व पुणे, सातारा जिल्ह्यातील आणखी तिघेजण असे एकूण ५ आरोपींना दि.११ जुलै रोजी अटक केली होती.
लाकडी दांडग्याने बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची कबुली
त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिनाथ मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसून चौकशी केल्यानंतर अटकेतील आरोपींनी दिलीप भिकाजी इंगळे याला २२ जुन रोजी रात्री कोपरगाव नजीक लाकडी दांडग्याने बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची केल्याची कबुली दिल्यामुळे आज दि. १२ जुलै रोजी या प्रकरणात कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्ह्यात वाढ करण्यात आली असून सर्व आरोपींना मेहकर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
वैजापूर रोडवर लाकडी दांडक्याने केली बेदम मारहाण
आरोपींनी मृतक दिलीप भिकाजी इंगळे याला पैशाच्या व्यवहारातून कोपरगाव वैजापूर रोडवर दि.२२ जुन रोजी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती आणि यावेळी त्याचा जबर मारहाणीत मृत्यू झाला होता असे पोलीस तपास दरम्यान आरोपींनी आपल्या जबाबात सांगितले आहे.
नातेवाईक पोहचले कर्जत पोलीस ठाण्यात , कपड्यावरून झाली खातरजमा
कर्जत नजीक पोलिसांना मिळालेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हा दिलीप भिकाजी इंगळे याचाच होता का? याबद्दल साशंकता होती त्यामुळे जानेफळ तालुका मेहकर येथून दिलीप इंगळे यांचे नातेवाईक आज दि. १२ जुलै रोजी कर्जत पोलीस स्टेशनला गेले होते परंतु कर्जत पोलिसांनी मृतदेह हा पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे त्याचा पंचनामा करीत विशिष्ट वेळेत तपास करून शासकीय पद्धतीने विल्हेवाट लावली होती मात्र या कुजलेल्या मृतदेहाच्या अंगावरील पोलिसांनी जप्त केलेले कपडे तसेच मृतदेहाच्या शरीरावर असलेल्या टॅटू चा फोटो नातेवाईकांना दाखविला असता ते दिलीप भिकाजी इंगळे याचेच असल्याचे खात्री त्यांना पटली आहे.
गुन्ह्यात वापरलेल्या तीन कार पोलिसांनी केल्या जप्त
दिलीप भिकाजी इंगळे याचे अपहरण व खून प्रकरणात आरोपींनी वापरलेल्या तीन कार जानेफळ पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी बोलताना दिली आहे.