परभणी(Parbhani) :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या (Atrocious murder) झाल्यानंतर राज्यभरात मुकमोर्चे काढून न्यायाची मागणी केली जात आहे. शनिवार ४ जानेवारी रोजी परभणी येथे सर्वपक्षीयांच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबीयांना न्याय द्यावा, आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या नुतन महाविद्यालयाच्या मैदानावरुन मोर्चाला सुरुवात झाली. महाराणा प्रताप चौक, शनीमंदिर, नानलपेठ कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चा दाखल झाला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. व्यासपीठावर खा. संजय जाधव, आ.डॉ. राहूल पाटील, आ. राजेश विटेकर, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षिरसागर, मनोज जरांगे पाटील, डॉ. ज्योतीताई मेटे, माजी आ. सुरेश वरपुडकर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी खा. सुरेश जाधव, माजी आ. विजय गव्हाणे, मिनाताई बोर्डीकर, अॅड. दिपक देशमुख, आनंद भरोसे, रविराज देशमुख, बाळासाहेब जामकर, भगवान वाघमारे, सोनाली देशमुख, भिमराव मराठे, विशाल कदम, सुरेश भुमरे, सुभाष जावळे, दादासाहेब टेंगसे यांची उपस्थिती होती. तसेच स्व. संतोष देशमुख यांच्या परिवारातील धनंजय देशमुख, वैभवीताई देशमुख हे हजर होते. मोर्चात सहभागी समाजबांधवांनी हातात बॅनर, पोस्टर घेतले होते. तर हाताला काळ्या फिती बांधलेल्या होत्या. प्रास्ताविक सुभाष जावळे यांनी केले. मोर्चाला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. मोर्चाच्या शेवटी सरपंच संतोष देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. यावेळी महिला बचत गटाच्या वतीने देशमुख कुटूंबीयांना दिड लाखाच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले.