रिसोड (Nagar Parishad Election) : मा. राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ च्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर केल्यानुसार नगर परिषद व नगर पंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मा. राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचे निर्देशानुसार विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांचे दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ चे आदेशानुसार मा. श्री. अनिल खंडागळे, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांची (Nagar Parishad Election) नगर परिषद रिसोड निवडणूक-२०२५ करिता निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर नियुक्तीप्रमाणे निवडणूक निरीक्षक मा. अनिल खंडागळे यांनी आज रिसोड येथे निवडणूक कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मा. निवडणूक निरीक्षक यांनी निवडणूक संदर्भातील नियुक्त पथक प्रमुख यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल होत असलेले नामनिर्देशन पत्र स्वीकारतांना तपासावयाचे दस्तावेज, पडताळणी सूची याबाबत पथक प्रमुख व इतर सहायक यांना मार्गदर्शन केले. (Nagar Parishad Election) रिसोड नगर परिषद निवडणुकी संबधात स्थापन केलेले तक्रार निवारण कक्ष, मतदार सहायता कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष, तहसील कार्यालय रिसोड स्थित सुरक्षा कक्ष यांची पाहणी केली.
तसेच मतदान यंत्र सिलिंग, मतदानाकरिता साहित्य वाटप व मतमोजणीबाबत तयारीचा आढावा घेतला.तदनंतर त्यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. यासोबतच मा. निवडणूक निरीक्षक यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेले स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, फिरते पथक यांना भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी करून कामकाजाबाबत आवश्यक ते निर्देश दिले व निवडणूक कामकाजासंदर्भातील नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी मा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रतिक्षा तेजनकर, मा. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सतिश शेवदा तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.




