- रामटेकच्या विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur) :- लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्याचे मतदान पार पडले असून अखेरचा टप्पा शिल्लक आहे. जिल्ह्यातील नागपूर व लोकसभा मतदार संघाची ( Lok Sabha Constituency ) निवडणूक १९ एप्रिल रोजी पार पडल्याने नागरिकांना निकालाची मोठी उत्सुकता आहे. आता ४ जूनला मतमोजणी होणार असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. नागपूर व रामटेक ( Nagpur and Ramtek ) लोकसभेसाठी कळमना बाजार येथे मतमोजणी होणार आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी पार पडली. ग्रामीण भागात विद्यमान केंद्र सरकारविरोधात असलेला रोष व संविधान बदलविण्याच्या विरोधकांच्या प्रचाराने महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या रोषाचा सामना करावा लागला. त्यात रामटेक व नागपूरमध्ये बसपा कमकुवत असलेला उमेदवार व रामटेकमध्ये वंचितच्या उमेदवारीने घातलेला घोळ, त्यात शेवटी माजी सनदी अधिकाऱ्यांना द्यावा लागलेल्या पाठिंब्यामुळे आंबेडकरी मते महाविकास आघाडीकडे वळल्याची चर्चा आहे. परंतु, त्यानंतरही महायुतीकडून विजयाचा दावा होत असल्याने शंका-कुशंकांना पेव फुटले आहे. आता ४ जून रोजी मतमोजणी होणार असल्याने महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांमध्ये घालमेल वाढली असून रामटेकच्या विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? यावरच चौका-चौकात तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे.
– रामटेक लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक २६ फेऱ्या
दोन्ही मतदारसंघात मोजणीसाठी २० टेबलची व्यवस्था असणार आहे. या प्रत्येक मतदारसंघात २० टेबल असतील. ईव्हीएममधील मतांची मोजणी येथे होईल. तर पोस्टल बॅलेटच्या मोजणीसाठी १० स्वतंत्र टेबल असतील. प्रत्येक टेबलवर ४ कर्मचारी राहतील. २० टेबलवर एकाच वेळी मतमोजणी होईल. ही मोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या फेऱ्या कमी-जास्त राहणार आहे. नागपूरमध्ये सर्वात जास्त २० फेऱ्या उत्तर नागपूर तर सर्वात कमी १६ फेऱ्या या मध्य नागपुरात असेल. तर रामटेक लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक २६ फेऱ्या या कामठीत तर सर्वात कमी १७ फेऱ्या या काटोल विधानसभा मतदारसंघात होतील उत्तर नागपूरमध्ये २० तर कामठीत सर्वाधिक २६ फेऱ्या
- सकाळी ८ वाजतापासून सुरुवात
प्रत्यक्ष मतमोजणी ८ वाजतापासून सुरू होईल. प्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. ही सुरू झाल्यानंतर काही वेळाने ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. ईव्हीएममधील मतांची मोजणी झाल्यानंतर पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मिळालेली उमेदवारनिहाय मते जाहीर होतील.
– विधानसभा संघनिहाय मतमोजणी टेबल संख्या
नागपूर लोकसभा विधानसभा फेऱ्या दक्षिण – पश्चिम १९ दक्षिण १८ पूर्व १८ मध्य १६ पश्चिम १७ उत्तर २०
– रामटेक लोकसभा, विधानसभा फेऱ्या
काटोल १७, सावनेर १९ हिंगणा २३, उमरेड २० कामठी २६, रामटेक १८
– नागपूरात ५४.३० तर रामटेकमध्ये ६१ टक्के मतदान
नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ५४.३० तर रामटेक लोकसभेसाठी ६१ टक्के मतदान झाले. दक्षिण पश्चिममध्ये ५२.९४ टक्के तर दक्षिण ५३.९५ टक्के, पूर्व ५५.७८ टक्के, मध्य ५४.६ टक्के, नागपूर पश्चिम ५३.७३, उत्तर ५५.२० टक्के एवढे मतदान झाले. याची एकूण सरासरी ५४.३० टक्के एवढी आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात ६१ टक्के एवढे मतदान झाले. काटोल ६१.९६ टक्के, सावनेर ६१.४४, हिंगणा ५४.१६ टक्के, उमरेड ६७.१६ टक्के, कामठी ४८.६९ टक्के आणि रामटेक ६६.३७ टक्के एवढे मतदान झाले आहे.