– महिला रुग्णाच्या विमा क्लेमवरुन प्रकरण उघडकीस
– पोलिसांकडून पॅथलॅब सील, आक्षेपार्ह साहित्य जप्त
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर ( Nagpur ) :- एका महिलेच्या विमा क्लेमवरुन ( Insurance claim ) पॅथ लॅबने दिलेला अहवाल हा बनावट असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी ( Pachpavali Police ) इंदोरा चौकातील एका पॅथलॅबची ( PathLab ) झडती घेतली तसेच आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. यासोबतच पॅथलॅब सिल केले. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी डॉक्टर आणि पॅथलॅब (Doctor and Pathlab ) संचालकावर गुन्हा नोंदविला आहे. डॉ. राजेश सुरेश बुटे रा. अकोला (Akola) असे फिर्यादी डॉक्टरचे नाव आहे. आरोपींमध्ये इंदोरा चौकातील शाश्वत रुग्णालयाचे संचालक डॉ. संजीव चौकसे ( Director Dr. Sanjeev Chukse ) आणि स्टार २४ पॅथलॅबच्या संचालकाचा समावेश आहे. डॉ. बुटे (Dr. Bute )हे पॅथालॉजीमध्ये एमडी आहेत. महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल(Maharashtra Medical Council) मध्ये त्यांची नोंदणीही आहे. अपघातामुळे बुटे यांना अपंगत्व आले आहे. सध्या ते स्वत:ची पॅथालॉजी लॅब सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. डॉ. चौकसे यांचे इंदोरा चौकात शाश्वत रुग्णालय आहे. त्यांच्याकडे येणार्या रुग्णांची रक्त आणि मुत्र तपासणी स्टार २४ पॅथलॅबमध्ये करून घेतली जाते. विशेष म्हणजे लॅब संचालकाकडे लॅब चालविण्यासाठी पदवी नाही. डॉ. बुटे यांच्या लेटरहेडचा वापर करीत होता आणि स्वाक्षरीही त्यांचीच मारायचा. या विषयी डॉ. बुटे यांना कुठलीच कल्पना नव्हती.
– आरोपींकडून त्यांचे नाव आणि लेटरहेडचा गैरवापर
एका महिला रूग्णाने या लॅबकडून अहवाल घेतला. विमा क्लेम करण्यासाठी विमा कंपनीला पाठविला. विमा कंपनीने ( insurance company ) बुटे यांच्याशी संपर्क केला. तपासणी अहवालावर तुमचीच स्वाक्षरी आहे का आणि तो प्रमाणित आहे का याची माहिती मागितली. या प्रकारामुळे बुटे यांना धक्का बसला. त्यांनी डॉ. चौकसेला ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच स्टार २४ लॅबशी ही त्यांचा कोणताही संबंध नसल्याची माहिती दिली. आरोपींकडून त्यांचे नाव आणि लेटरहेडचा गैरवापर केला जात असल्याने डॉ. बुटे यांनी पोलिसात तक्रार केली. त्यांच्या नावाने बनावट लेटरहेड ( Fake letterhead ) बनविणे आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत गैरकायदेशीर काम होत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी डॉ. चौकसे आणि स्टार २४ लॅबचे संचालकाविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.