– अजनी पोलिसांनी आरोपीला का दिले `अभय’?
– मेट्रो रेल्वेमध्ये नोकरीच्या नावावर अनेकांना गंडा प्रकरण
नागपूर (Nagpur) – मेट्रो रेल्वेमध्ये (Metro Rail ) नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करणार्या आरोपीला अजनी पोलिसांनी अभय दिल्याची चर्चा आहे. आरोपी ठगाने फसवणुकीसाठी आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या नावासह बनावट लेटरहेडचा (fake letterhead) वापर केल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अजनी पोलिसांनी (Ajani police) त्वरित गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. दुसरीकडे, सदरप्रकरणी मेट्रो प्रशासनाने (Metro Administration) वेळीच चौकशी केली आणि संबंधित आरोपी सुरक्षा रक्षकाला (accused security guard) तडकाफडकी सेवेतून निलंबित (suspended from service) केले. त्यामुळे अजनी पोलिसांची कार्यपद्धती संशयाच्या घेर्यात आली आहे. अक्षय सुभाष नगराळे,(Akshay Subhash Nagarle) रा. श्रमिकनगर, परसोडी खापरी असे पीडित फिर्यादी युवकाचे नाव आहे. रूपेश शेंडे, रा. जोगीनगर, शताब्दी चौक, रिंग रोड असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अक्षयचा एक लहान भाऊ भन्ते आहे. तो परसोडी येथील विहारात भन्ते धम्मानंद यांच्या सोबत राहतो. धार्मिक कार्यानिमित्त भन्ते धम्मानंद (Bhante Dhammanand) यांची आरोपी रूपेश शेंडे सोबत ओळख झाली. रूपेश हा मेट्रो रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षक आहे.
१ लाख ५० हजार रुपयाची मागणी
यावेळी त्याने मेट्रोमध्ये जागा खाली असून कुणी ओळखीतील असल्यास मला सांगा. त्याला कमी पैशात येथे नोकरीवर लावून देईल, असे म्हटले. त्यामुळे भन्ते धम्मानंद यांनी अक्षयचे नाव सुचवले असता १ लाख ५० हजार रुपयाची मागणी केली. अक्षयच्या आईने अंगावरील सोने गहाण ठेवून धम्मानंद यांच्या समक्ष जोगीनगर येथे रूपेशला त्याच्या घरी ५० हजार रुपये दिले. नंतर रूपेशने एके दिवशी अक्षयसह तीन-चार तरुणींनाही दीक्षाभूमीजवळील मेट्रो रेल्वेच्या ऑफिसला बोलाविले. यावेळी आरोपी रूपेशने आमदार समीर मेघे यांच्या नावासह बनावट लेटरहेडवर शिफारस पत्र तयार करून आणले होते. ते अक्षयला १९ जून २०२३ ला मेट्रो ( Metro to Akshay on June 19, 2023) ऑफिसमध्ये देण्यास सांगितले. त्यानुसार आधी अर्ज आणि नंतर आमदारांचे शिफारस पत्र देऊनही अक्षयला मेट्रोमध्ये नोकरी लागली नाही. उलट आरोपीने भंते धम्मानंद यांच्या नावाने दिलेला ३० हजाराचा धनादेशसुद्धा बँकेत वटला नाही. शेवटी फिर्यादी अक्षयने अजनी पोलिसांकडे १० एप्रिल २०२४ रोजी लेखी तक्रार केली. नंतर स्मरणपत्रसुद्धा दिले. तरीही अजनी पोलिसांनी कारवाई न करता आरोपी रूपेश शेंडेला संरक्षण दिले, असा आरोप आहे.
रॅकेटमध्ये आरोपी शेंडेसह अनेकांचा समावेश?
आरोपी रूपेश शेंडेने (Accused Rupesh Shende) आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या नावासह त्यांच्या बनावट लेटरहेडचा फसवणुकीसाठी वापर केला आहे. लेटरहेडवर राजमुद्रा व मुंबईतील (Rajmudra and Mumbai) विधानभवनाच्या इमारतीचा लोगो प्रिंट केला आहे. यावरून या रॅकेटमध्ये आरोपी रूपेश शेंडेसह अनेकांचा समावेश असावा. त्यामुळे रूपेशला अटक झाल्यास मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
आता पोलिस आयुक्तांनीच लक्ष घालावे
संविधानिक पदावरील एखाद्या आमदाराच्या नावासह त्यांच्या बनावट लेटरहेडचा वापर होणे गंभीर बाब आहे. असे असूनही अजनी पोलिसांचे झालेले दुुर्लक्ष आणि त्यांची संशयास्पद कार्यपद्धती (Suspicious practices) बघता याप्रकरणी आता पोलिस आयुक्तांनीच (Commissioner of Police) लक्ष घालावे, अशी पीडित अक्षय नगराळे यांची मागणी आहे.