- पालकांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे उघडकीस
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur) :- आरटीई (RTE) शाळा प्रवेश घोटाळा प्रकरण शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल (Dr. Ravindra Single) यांनी गंभीरतेने घेतले आहे. आरोपींनी शासनाच्या फसवणुकीशिवाय पालकांचा, विशेष गरीब गरजू अल्पवयीन मुलांचाही अधिकार हिरावला. त्यामुळे गठीत एसआयटीकडून (SIT) मुळाशी जाऊन चौकशी करीत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी एक आणि सदर पोलिसांनी एक अशा दोन पालकांना अटक केली आहे. सदरच्या अटकेतील एका आरोपी पालकाचा पीसीआर संपला होता. त्याला आज न्यायालयात (court) हजर केले असता पुन्हाएका दिवसाचा पीसीआर वाढवून मिळाला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद शरीफ आरटीई शालेय प्रवेशासंदर्भातील शासनाच्या जिल्हास्तरीय समितीत पूर्वी सदस्य होता. त्याला आरटीईची प्रवेश प्रक्रिया कशी चालते, त्यातील नियम काय याची संपूर्ण माहिती होती आणि त्याच आधारावर शाहिद शरीफने अनेक पालकांना गाठून त्यांच्यासह शासनाची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सुरुवातीपासूनच पोलिसांकडून कठोर भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान शिक्षण विभागातील समितीच्या (Committee Education Department) पडताळणीत शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे उघडकीस आले. त्याआधारे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीताबर्डी आणि सदर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविले. यानंतर यातील म्होरक्या शाहिद शरीफ नागपुरातून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचे घर आणि कार्यालयाची झडती घेतली असून, घर झडतीत मोठ्या प्रमाणावर बोगस दस्तावेज, प्रमाणपत्रे, शिक्के पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरटीईअंतर्गत जेव्हा गरीब कुटुंबातील मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो, तेव्हा त्या मुलांची फी शासनाकडून भरली जाते. त्यामुळे आरटीईमध्ये बोगस प्रवेश घडवून शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आल्याचेही पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले.
■ पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल गंभीर, दिला इशारा
एसआयटी प्रकरणाच्या मुळाशी जाऊन करणार चौकशी शाहिदवर भारतीय हत्यार कायद्यान्वये (Indian Arms Act) गुन्हा दाखल या प्रकरणी सीताबर्डीमध्ये १७ जणांवर तर सदर पोलिस ठाण्यांत २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी मुख्य आरोपी मास्टरमाईंड शाहिद शरीफच्या (Shahid Sharif’s) घराची झाडाझडतीही घेण्यात आली. यावेळी आरटीई प्रवेशासंबंधातील अनेक आक्षेपार्ह कागदपत्रासह तलवार सापडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी सदर पोलिसांमार्फत सरकारच्या वतीने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये ४, २५ नुसार आरोपी शाहिद शरीफवर गुन्हा दाखल करण्यात आला.
– पबमध्ये १८ पेक्षा कमी वयाच्या बालकांना प्रवेश नको
पबमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना प्रवेश नको, असे सांगून डॉ. सिंगल (Dr. Single) म्हणाले, कलम १४४ मध्ये नमूद असल्याप्रमाणे प्रत्येक पब मालकाने परिसरात घडलेली घटना पोलिस ठाण्याला सांगणे बंधनकारक आहे. अंबाझरी पोलिस ( Ambazari Police ) ठाण्यांतर्गत झालेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिणाऱ्यांवर कारवाई करून कलम ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी मागील वर्षी २७५ केसेस होत्या. चालू वर्षी ६८८ केसेस आहेत.