ओबीसींची नितीन गडकरींनाच पसंती
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur) : बहुप्रतिक्षेत असलेल्या लोकसभेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. भाजपचे हेविवेट नेते नितीन गडकरी ( Nitin Gadkari) मैदानात असल्याने नागपूर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशभराचे लक्ष लागून होते. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आली होती. जातीय समिकरण साधत काँग्रेसने शहराध्यक्ष आ.विकास ठाकरे ( Vikas Thackeray ) यांना उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत वंचित, एमआयएम यांचा उमेदवार नसणे व बसपाने कमकुवत उमेदवार दिल्याने गडकरींना वाट खडतड जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्याच जातीय समिकरणानूसार दलित, मुस्लीम व ओबीसी मतांच्या जोरावर काँग्रेसने विजयाचे आखाडे बांधणे सुरू केले होते. परंतु, दलित, मुस्लीम मते वगळता ओबीसींनी गडकरींना पसंती दिल्याने काँग्रेसच्या सोशल इंजिनिअरींगचा पुरता फज्जा झाल्याचे दिसून येते.
नागपूरसह राज्यातील लोकसभेच्या ७ जागांसाठी १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते. ज्यामध्ये एकूण ५५.३५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवारी पार पडलेल्या मतमोजणीत नितीन गडकरी यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. मध्यंतरी सहावी फेरी वगळता आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत १ लाख ३७,६०३ मताधिक्याने विजय प्राप्त केला. यापूर्वी काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी सलग चार वेळा येथून विजयी झाले आहे. यानंतर गडकरी यांनी हॅट्ट्रीक साधली. गडकरींनी इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांचा १,३७,६०३ मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत गडकरींना ६,५५,०२७ मते मिळाली तर ठाकरे यांना ५,१७,४२४ मतांवर समाधान मानावे लागले. जातीय समिकरणे बघाता विकास ठाकरे यांचे पारडे जड माणले जात होते. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठींबा व एमआयएमचा उमेदवार नसणे बीएसपीचा (BSP ) कमकुवत उमेदवराचा महाविकास आघाडीला फायदा होणार असे बोलले जात होते. परंतु, उत्तर नागपूर वगळता महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाचही विधानसभा क्षेत्रा भरभरून मते मिळाली.
> नागपूरचे ‘गड’करीच
नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari ) यांचे दोन गट आहे. संपूर्ण निवडणुकीत गडकरी यांनी गल्लीबोळात प्रचार सभा घेतल्या. मात्र फडणवीस गटाकडून योग्य सहकार्य मिळाले नसल्याचे सांगितले जाते. गडकरींनी सर्व शक्ती पणाला लावून विजयश्री खेचून आणत आपणच नागपूरचे गड‘करी’ आहोत, हे दाखवून दिले.