देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nagpur Zilla Parishad) : जिल्हा परिषदमध्ये अनुकंपातत्त्वारील नियुक्त्या गत अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. तत्त्क्तकालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) योगेश कुंभेजकर यांच्याकाळापासून अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा प्रश्न गतीने मार्गी लावण्यात आला. तीच गती तत्त्कालीन सीईओ सौम्या शर्मा आणि विद्यमान सीईओ विनायक महामुनी यांच्याही काळात कायम असून, आजवर या तीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात तब्बल २४४ अनुकंपाधारक पात्र उमेदवारांना न्याय देत नियुक्ती देण्यात आली असून जवळपास बॅकलॉग संपल्याचे सांगितले जात आहे.
शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास ज्येष्ठता क्रमाने वर्ग-३ व वर्ग-४ पदावर समुपदेशनाने शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर पदस्थापना देण्यात येत असते. ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. परंतु गेल्या चार पाच वर्षांपूर्वीपर्यंत अनुकंपाधारकांना नियुक्तीची गती (Nagpur Zilla Parishad) जि. प. मध्ये मंदाविल्याचे पहायला मिळाले.
शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपातत्त्वावर नोकरीत सामावून घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाचा गाडा हाकता यावा, हे यामागील मुख्य उद्दिष्ट असते. त्यानुसार (Nagpur Zilla Parishad) जि. प. मध्ये जवळपास निम्यावर कर्मचारी हे अनुकंपातुनच नियुक्त असल्याचे सांगण्यात येते. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत दरवर्षी अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी वाढत जात होती, परंतु नियुक्तीचा प्रश्न रखडल्याचे चित्र होते. अनेक जण दशकभरानंतरही आपल्या नियुक्तीच्या प्रतीक्षेतच होते. परंतु कुंभेजकर यांनी या अनुकंपाधारकांना न्याय देण्यासाठी त्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचा ध्यास धरला. त्यानुसार त्यांच्या काळामध्ये वर्ष २०२२-२३ मध्ये तब्बल ९३ अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्यात आली.
त्यावेळी दहा वर्षांपूर्वीचे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. (Nagpur Zilla Parishad) सीईओ शर्मा यांच्या काळात अर्थात वर्ष २०२३-२४ मध्ये ७८ आणि आता विद्यमान सीईओ विनायक महामुनी यांच्या काळात नुकतीच ७३ अनुकंपाधारकांना शासकीयसेवेत सामावून घेत त्यांना नियुक्ती देण्यात आली. अशापद्धतीने गेल्या अडीच-तीन वर्षांमध्ये नागपूर जि. प. प्रशासनाने अनुकंपातत्त्वावर तब्बल २४४ उमेदवारांना नियुक्ती देत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. झपाट्याने अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा प्रश्न निकाली निघत असल्याने आता प्रतीक्षा यादीही संपल्यागत परिस्थिती आहे.
अडीच-तीन वर्षात २४४ उमेदवारांना मिळाल्या नियुक्त्या
कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्याही मार्गी लागणार सूत्रांच्या माहितीनुसार आता अनुकंपा नोकरीसाठी २०२३ पर्यंतची प्रतीक्षा यादी पूर्ण झाली असून, आता केवळ २५ उमेदवार शिल्लक आहेत. त्यांनाही येत्या काळात लवकरच नियुक्ती देण्याचा मानस (Nagpur Zilla Parishad) जि.प. प्रशासनाचा आहे. निव्वळ अनुकंपा उमेदवारांनाच नाही, तर कार्यरत कर्मचाऱ्यांच्याही सेवाविषयक बाबी ज्यामध्ये आश्वासित प्रगती योजना, पदोन्नती हे विषय देखील योगेश कुंभेजकर यांच्यासोबतच सौम्या शर्मा यांनी झपाट्याने निकाली काढलेत. त्याच पद्धतीने महामुनी देखील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे.