नागपूर (Nagpur) : ‘न्यू नागपूर’ म्हणून उदयास आलेलया बेसा-पिपळा नगरपंचायत (Besa-Pipla Nagar Panchayat) अंतर्गत क्षेत्राचा ‘स्मार्टसिटी’च्या (Smart City) धर्तीवर विकास होत आहे. येथील मुख्य रस्त्यांसह चारही बाजूच्या अंतर्गत रस्त्यांच्या विकासावर भर दिला जात आहे. एवढेच नव्हे तर 16 कोटी 2 लाख 13 हजार 34 रुपयाच्या विकास निधीतून विविध विकास कामे युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे लवकरच बेसा-पिपळा परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे प्रशासन व मुख्य अधिकारी भारत नंदनवार यांनी देशोन्न्तीशी बोलतांना सांगितले.
पोहरा नदीच्या काठावरील विविध वसाहती ‘बॉक्स सेल’ पुलाने जोडणार
याविकास कामात बेसा-पिपळा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या खसरा क्र. 160 व 168 मधील रस्त्यांसह पोहरा नदी काठावरील आदर्श विद्या संस्कार ते शामनगर वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यावर 1 कोटी 34 लाख 52 हजार 316 रुपये खर्चातून ‘बॉक्स सेल’ (Box Cell) पुल बांधण्यात येत आहे. बेसातील गायत्रीनगर येथील मोकळ्या जागेवरही विकास कामे (Development Works) प्रस्तावित आहे. यासाठी 32 लाख 70 हजार 46 रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच येथे बेसा व पिपळा अशा दोन स्मशानभूमी आहेत. मात्र दोन्ही स्मशानभूमी विकसित नसल्याने येथील नागरिकांना आप्तेष्ठांच्या अंत्यसंस्कारासाठी महानगर पालिकेच्या (Municipal Corporations) हद्दीतील मानेवाडा स्मशानभूमीशिवाय पर्याय नव्हता. येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर नागरिकांना मृत्यु प्रमाणपत्रासाठी बरीच पायपीट करावी लागायची. मात्र आता या दोन्ही दहन घाटांचा युद्धपातळीवर विकास होत आहे. एकट्या बेसा स्मशानभूमीच्या विकासासाठी 1 कोटी 53 लाख 95 हजार 670 रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. येथील संरक्षण भिंतीसह रस्त्याच्या विकासासाठी 63 लाख 41 हजार 956 रुपयाचा निधी खर्च (Expenditure of Funds) केला जात आहे. यासह पिपळा भागातील स्मशानभूमीच्या विकासासाठी 95 लाख 21 हजार 110 रुपयाचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
16 कोटींचा निधी, ई-लॉयब्ररी, बॅडमिंटन कोर्टसह दहनघाट बांधणार
तसेच लक्ष्मी इस्टेट, पिपळा खरसोली रोड ते ग्रामपंचायतच्या मागील नाल्यापर्यंत पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. पाईप लाईन नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागायचे. या विकास कामासाठीसुद्धा 1 कोटी 42 लाख 37 हजार 542 रुपयाच्या निधीच्या खर्चाची तरतूद आहे. तसेच बेसा-पिपळा येथे नाल्याजवळील मोकळ्या जागेवर 1 कोटी 7 लाख 25 हजार 807 रुपयाच्या खर्चातून सुशोभीकरण करण्यासह येथे आकर्षक असा कारंजा लावून सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. हरीहर मंदिर परिसरातील मोकळ्या जागेवर नागरिकांच्या फिटनेसच्या दृष्टीने बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात येणार आहे. तसेच युवक व युवतींसाठी बेसा येथील खसरा क्र. 66/अ व 66/ब येथील मोकळ्या जागेवर 2 कोटी 50 लाखाच्या खर्चातून ई-लायब्ररी तयार करण्यात येणार आहे.
स्मशानभूमीवर लागणार एलपीजी गॅस दहन यंत्र
पिपळा व बेसा या दोन्ही ठिकाणच्या स्मशानभूमीवर मोठा हॉल बांधून एलपीजी गॅस दहन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. येथे हॉलसाठी 45 लाख 36 हजार 366 रुपये व एलपीजी गॅस दहन यंत्रासाठी 1 कोटी 5 लाख 63 हजार 35 रुपयाच्या निधीच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच परिसरात 1 कोटी 55 लाख 45 हजार 671 रुपयाच्या खर्चातून मटन मार्केट विकसित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक व मुख्य अधिकारी भारत नंदनवार (Administrator and CO Bharat Nandanwar) यांनी दिली.