नैनिताल (Uttarakhand) : उत्तराखंडमधील नैनितालच्या जंगलामध्ये मोठी आग लागली आहे. ही आज सतत वाढत असून, नियंत्रणाच्या बाहेत जात आहे. मागील चार दिवसांपासून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नैनिताल हायकोर्ट कॉलनीजवळ जंगलात ही आग लागली आहे. आग विझवण्यात वनविभाग, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अनेक पथकांच्या सर्व प्रयत्न सुरूच आहेत. आता आयएएफनेही आग विझवण्यास सुरुवात केली असून, भारतीय हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.
भीमताल तलावातून पाणी भरून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत आगीमुळे अनेक हेक्टर जंगल जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. आग विझवितांना तिथे जोरदार वारे वाहत असल्यामुळे पथकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या वाऱ्यांमुळे आग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या आगीमुळे तेथील नौकाविहार बंद करण्यात आला आहे.
With a forest fire building up in vicinity of an Air Force Station near Nainital, #IAF activated its aerial fire fighting capability, employing a Mi-17 V5 helicopter for undertaking Bambi Bucket Ops. pic.twitter.com/2wLbTjW5m8
— Indian Air Force (@IAF_MCC) April 27, 2024
माहितीनुसार, आगीमध्ये नैनितालच्या लादियाकाटा एअरफोर्स, पाइन्स, गेठिया, बलदियाखान, मेष, बारा पत्थर परिसराचा समावेश आहे. हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून सातत्याने पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. भीषण आगीमुळे टिफिनटॉप आणि नयना शिखर, स्नोव्ह्यू, कॅमल्स बॅक यांसारख्या इतर टेकड्यांवर दाट धूर आहे. याशिवाय जंगलातील आगीचा धूर शहराच्या सखल भागातही वेगाने पोहोचत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे.
माहितीनुसार, कुमाऊँच्या जंगलात आग लागली आहे. गेल्या काही तासांत कुमाऊँच्या जंगलात जवळपास 26 ठिकाणी आग लागली आहे. तसेच गढवाल विभागात अद्याप आग लागल्याची माहिती मिळाली नाही. चमोली जिल्ह्यातील जंगलातही आग लागली आहे. त्याचबरोबर जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे तापमानातही लक्षणीय वाढ झाली आहे. या आगीचा थेट परिणाम नैनिताल आणि परिसरातील पर्यटनावर होत आहे.