परभणी(Parbhani) :- परभणी येथील जिल्हा नेत्र रुग्णालयात (Eye Hospital) येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना नेत्र तपासणीकरिता आल्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासण्यांकरिता जिल्हा रुग्णालय ते नेत्र रुग्णालय अशी दोन कि.मी ची फरपट करावी लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातच एकाच छताखाली नेत्र रुग्णालय आणले तर जिल्हाभरातून येणाऱ्या वयोवृद्ध नेत्ररुग्ण नागरिकांची ससेहोलपट होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर नेत्र रुग्णालयाचे स्थलांतर जिल्हा रुग्णालयाकडे करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
नेत्र रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयात स्थलांतर होण्याची गरज…
दररोज २५० ते ३०० ओपीडी असणाऱ्या तसेच दररोज च्या २० नेत्र शस्त्रक्रिया असणाऱ्या व २० खाटांची संख्या असणाऱ्या परभणी येथील शनिवार बाजार स्थित नेत्र रुग्णालयात जिल्हाभरातून नेत्र रुग्ण तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता येत असतात. ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची (Cataract surgery) आवश्यकता आहे. त्यांना ऑपरेशन पूर्व विविध तपासण्या कराव्या लागतात. त्या तपासण्यांची सुविधा नेत्र रुग्णालयात नसल्याने रुग्णांना चिठ्ठी देऊन जिल्हा रुग्णालयात जाऊन विविध तपासण्याकरिता २ कि.मी च्या वर नेत्र रुग्णालय ते जिल्हा रुग्णालय चकरा माराव्या लागतात. तपासण्या झाल्यानंतर ऑपरेशनची तारीख ठरते त्यामुळे वयोवृद्ध नेत्र रुग्ण नागरिकांची यात मोठ्या प्रमाणावर फरफट होत आहे.
त्यामुळे जिल्हा रुग्णालयातच नेत्र रुग्णालय स्थलांतर करण्यात यावे जेणेकरून ऑपरेशन पूर्व तपासण्याही एकाच ठिकाणी होतील व नेत्र तपासणी होतील. ज्यामुळे वयोवृद्ध नेत्र रुग्णांची ससेहोलपट होणार नाही .त्यामुळे लवकरात लवकर जिल्हा रुग्णालयात नेत्र रुग्णालय स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे…