देवेंद्र फडणवीसः राजतिलक की करो तैयारी
एकनाथ शिंदेः राज्याचे भावी मुख्यमंत्री
देशोन्नती वृत्तसंकलन
नांदेड (Nanded Assembly Elections) : विधानसभेच्या निवडणुकांना एकसंघपणे सामोरे गेलेल्या व निर्विवाद बहुमत प्राप्त केलेल्या महायुतीतील भाजपा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात मुख्यमंत्री पदावरुन घमासान सुरु आहे. त्यामुळे राज्याचा नवा मुख्यमंत्री नेमका कोण? हा ‘सस्पेन्स’ अजून कायमच ! यात नांदेडातील त्या-त्या पक्षाच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी ‘बॅनरवॉर’ सुरु केले आहे. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची छबी ठळक आकारात लावून ‘राजतिलक की करो तैयारी’ असे तर शिंदे सेनेकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या छबीसह ‘भावी मुख्यमंत्री’ असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या हे ‘बॅनरवॉर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
महायुतीच्या नव्या सरकारच्च्या शपथविधीचा मुहूर्त गुरुवार ५ डिसेंबर रोजी निश्चित झाला आहे. परंतु मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. याशिवाय मंत्री पदाच्या जागा भाजपा- शिंदे सेना व दादांच्या राष्ट्रवादीला किती द्यायच्या, यावरही महायुतीच्या श्रेष्ठींमध्ये खल सुरु आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्पष्ट झाले. मात्र मुख्यमंत्री पक्षाचा दावा नाही, हे एव्हाना पदावरुन भाजपा व शिंदेसेनेत राजकारण ताणले गेले. केंद्रात मंत्री अथवा राज्यात उपमुख्यमंत्री, अशी भाजपाची शिंदेसेनेला ‘ऑफर’ आहे.
परंतु एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही पर्यायावर राजी नसल्याचे कळते. त्यामुळे महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधीला अवघा तीन दिवस शिल्लक असतानाही हा तिढा सुटता सुटेना झाला. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद हा पर्याय शिंदेसेनेच्या विचाराधिन आहे. मात्र भाजपाला हा ‘फॉर्म्यूला’ सुध्दा मान्य नाही, अशी चर्चा आहे. दरम्यान एकीकडे महायुतीत मुख्यमंत्री पदावरुन तिढा तर दुसरीकडे नांदेडमधील दोन मित्र पक्षात सुरु झालेले ‘बॅनरवॉर’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. नांदेडमध्ये शिंदेसेनेच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या छबीसह ‘भावी मुख्यमंत्री’ असे तर भाजपाच्या देवेंद्र फडणवीस याच्या समर्थकांनी ‘राजतिलक की करो तैयारी’ असे ‘बॅनर’ त्यांच्या छबीसह लावले आहे. त्यामुळे नेमके कोणाचे ‘बॅनरवॉर’ मुख्यमंत्री पदाला गवसणी घालणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.
जिल्ह्यातील आमदारांची मंत्रीपदासाठी ‘लॉबिंग’!
जिल्ह्यातील नऊही विधानसभा मतदारसंघावर महायुतीने (Nanded Assembly Elections) आपले वर्चस्व राखले असून भाजपाचे ५, शिवसेना (शिंदे) पक्षाचे ३ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे १ आमदार निवडून आले आहेत. यापैकी भाजपाचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी कन्या आ. श्रीजया चव्हाण यांच्यासाठी तर आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. डॉ. तुषार राठोड व आ. भीमराव केराम व शिंदेसेनेकडून आ. बालाजीराव कल्याणकर यांनी ‘लॉबिंग’ लावली आहे.