नांदेड जिल्ह्यामध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू
नऊ विधानसभा व एका लोकसभा पोट निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
सोशल मीडियावर प्रचार प्रसार केल्यास सक्त कारवाई
72 तासात सर्व होर्डिंग व शासकीय कार्यालयातील प्रचार साहित्य साफ करा
मतदान करणे हा सुखद अनुभव बनविण्याचे प्रशासनाचे लक्ष्य
नांदेड (Nanded Assembly elections) : नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदार संघात विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबरला होत आहेत. तर नऊ पैकी सहा विधानसभा क्षेत्रांनी बनलेल्या १६ नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकही एकाच दिवशी 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन आज जिल्हा प्रशासनाने केले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दोन्ही निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज असून आजपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले.
२० नोव्हेंबरला मतदान २३ नोव्हेंबरला निकाल लागणार
नवी दिल्ली येथे भारतीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा केली. या घोषणेनुसार महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यामध्ये तात्काळ आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाल्याचे निर्देश दिले आहेत.
६ विधानसभा क्षेत्रात बोटाला एकदाच शाई मतदान मात्र विधानसभा व लोकसभेला
नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून यामध्ये किनवट, हदगाव,भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण,लोहा,नायगाव, देगलूर व मुखेड मतदार संघाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन मतदारसंघ हे लोकसभेसाठी लातूर व हिंगोली मतदार संघात आहे. यामध्ये किनवट,हदगाव हे हिंगोली लोकसभा तर लोहा हा मतदार संघ लातूर मध्ये येतो.
जिल्ह्यात २७ लक्ष ७१ हजार एकूण मतदार
दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे आता विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक होत आहे.त्यामुळे लोहा, किनवट, हदगाव हे तीन मतदारसंघ वगळता अन्य सहा मतदार संघामध्ये यावेळी निवडणुकीसाठी मतदारांच्या बोटाला शाई एकदाच लागेल. मात्र त्यांना विधानसभा व लोकसभेसाठी मतदान करावे लागणार आहे. मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर विधानसभा व लोकसभा मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या ईव्हीएम मशीन असतील व ४ ऐवजी ६ कर्मचारी तैनात असतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
३ हजार ८८ केंद्र ; ५ संवेदनशील
जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राची संख्या एकूण ३ हजार ८८आहे. मतदान केंद्रांचे ठिकाण 1992 आहे यामध्ये शहरी मतदान केंद्र 396 व ग्रामीण 1596 केंद्र आहेत. जिल्ह्यामध्ये 100% मतदान अधिकारी महिला असलेले, 100% मतदान अधिकारी दिव्यांग असलेले, तर 100% मतदान अधिकारी युवा असलेले मतदान केंद्र प्रत्येकी 9 आहेत. याशिवाय जिल्ह्यात ५ संवेदनशील मतदान केंद्रही आहेत. यामध्ये किनवट मधील पांगरपाड, हदगाव मधील चोरंबा, भोकर मधील पाकी तांडा, देगलूर मधील रामतीर्थ, मुखेड मधील कोलेगाव केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासूनच पोलीस दल कार्यरत होणार आहे. जिल्ह्यातील निवडणुका शांततेत व सुखद अनुभवाच्या ठराव्यात यासाठी 21 हजारावर कर्मचारी तैनात केले गेले असून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने लोकसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन या संदर्भात आधीच नियोजन केल्यामुळे कर्मचाऱ्यांची तरतूद मुबलक प्रमाणात करण्यात आली आहे.
कश्मीर पेक्षा अधिक मतदान व्हावे
निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जम्मू कश्मीर मधील दहशतवादी कारवाया असणाऱ्या भागात देखील नागरिकांनी अनेक ठिकाणी 60 ते 70 टक्के मतदान केल्याचे कौतुक केले. हे उदाहरण देऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी या निवडणुकीमध्ये आपले भविष्य ठरविण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे. मतदान करावे, असे आवाहन केले आहे. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांनी, तरूणांनी या संदर्भात जनजागरण करावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा सावलीची व्यवस्था, रांगे विरहित मतदान करण्याची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था,महिलांसाठी हिरकणी कक्ष, पाळणाघर व आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या आजूबाजूचा प्रत्येक नागरिक मतदान करेल यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरुणांनी या संदर्भात जनजागरण करावे व आपल्या जिल्ह्याची मतदान टक्केवारी वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच माध्यमांनी देखील या काळामध्ये या संदर्भात प्रचार प्रसार करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
छापेमारी अधिक कडक करणार
निवडणुकीत दारू, पैशांचा गैरवापर करणारे तसेच दांडगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे फिरत्या पथकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये उद्यापासूनच धडक कारवाईला सुरुवात होत असून पोलीस व संबंधित सर्व यंत्रणेला कडेकोट बंदोबस्त, नाकेबंदी आणि छापेमारी करायला सांगण्यात आले आहे.
समाज माध्यमांचा गैरव्यवहार टाळा
आचारसंहिता लागू झाल्यामुळे समाज माध्यमांवर वाटेल तशी पोस्ट टाकणे, प्रतिमा मलिन करणे, आरोप प्रत्यारोप करणे व त्यासाठी समाज माध्यमांचा वापर करणे उद्यापासून बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासंदर्भात सायबर सेल ला कार्यान्वित करण्यात आले असून पोलिसांची करडी नजर समाज माध्यमावर असणार असल्याचेही त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राजकीय जाहिराती पेड न्यूज गणल्या जाणार असून उमेदवाराच्या खात्यात किंवा पक्षाच्या खात्यात टाकल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात निवडणूक आयोगाचे पेड न्यूज बाबतचे स्पष्ट निर्देश वृत्तपत्रांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, नांदेड उत्तरचे निवडणूक उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, नांदेड दक्षिणचे निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, व निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
असा आहे कार्यक्रम
अधिसूचना जाहीर : २२ ऑक्टोंबर
नामांकनाची अंतीम तारीख : २९ ऑक्टोंबर
नामांकनाची छाणणी : ३० ऑक्टोबर
नामांकन मागे अंतीम तारीख : ४ नोव्हेंबर
मतदान तारीख. : २० नोव्हेंबर
मतमोजणी तारीख. : २३ नोव्हेंबर