डीपीडीसीच्या बैठकीत खा. रवींद्र चव्हाण यांनी उठविला आवाज!
नांदेड (Nanded) : जिल्ह्यात सर्रासपणे बोगस औषधी पुरवठा होत असून काही दिवसांपूर्वी झालेल्या बोगस औषधी पुरवठा करणाऱ्या दोषींवर कधी कारवाई होणार? असा सवाल खा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी गुरुवारी झालेल्या डीपीडीसीच्या (DPDC) बैठकीत उपस्थित केला.
जिल्ह्यातील पुनर्वसित गावांमधील स्मशानभूमीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, या गावांत सर्वच समाजांच्या स्मशानभूमीसाठी जागा देण्यासोबतच सर्व सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्यात विविध ठिकाणी नवीन रोहित्रे तसेच नादुरुस्त रोहत्रे बदलण्यासाठी माजी खा. स्व. वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांनी मागील बैठकीत 45 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली होती परंतु त्यासाठी 32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निधीतून महावितरणने (Mahavitaran) आजपर्यंत किती आणि कुठे रोहित्रे नव्याने बसविले? याबाबतची माहिती संबंधित विभागाने द्यावी अशीही मागणी खा. चव्हाण यांनी केली.
जिल्ह्यात बोगस औषधी पुरवठा झाल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले असून या गंभीर प्रश्नी संबंधित दोषींवर काय कारवाई झाली आणि असा प्रकार भविष्यात घडू नये यासाठी कोणते उपाय करण्यात आले? अशीही विचारणा त्यांनी केली. अर्धापूर येथे केळी क्लस्टर केंद्र (Cluster Center) स्थापन करण्याची मागणी प्रलंबित असून या मागणीला त्वरित प्रशासकीय मान्यता द्यावी तसेच धर्माबाद येथील मिरची संशोधन केंद्रालाही अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
नऊ स्थळांना तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या…
जिल्ह्यातील नवीन तीर्थक्षेत्र (Pilgrimage) विकास योजनेत श्रीक्षेत्र नामदेव महाराज मठ, बारूळ, महादेव मंदिर बोळसा गंप, मनूर, रामखडक, नाथोबा मंदिर, मरवाळी, गोदमगाव या 9 धार्मिक स्थळांचा नव्याने समावेश करावा याबाबतचे निवेदन पालकमंत्री अतुल सावे (Guardian Minister Atul Save) यांना खा. रवींद्र चव्हाण यांनी सादर केले.