महोत्सवात १ कोटीचा आंबा येणार
नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्पे (Agricultural Marketing Board) पहिल्यादांच नागपूर शहरामध्ये आंबा, मिलेट व धान्य असा एकत्रित महोत्सव १६ ते १९ मे रोजीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत श्रीमती कुसूमताई वानखेडे भवन, (Smt. Kusumtai Wankhede Bhawan,) उत्तर अंबाझरी मार्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन गुरुवार, १६ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे उपमहाव्यवस्थापक अजय कडू (Deputy General Manager Ajay Kadu) यांनी दिली.
या महोत्सवात विविध प्रजातींचा सुमारे १ कोटी रुपये किंमतीचा आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
मंडळाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत कडू यांनी सांगितले की, राज्यामध्ये ‘महाराष्ट्र श्री अन्न अभियान’ सुरू करण्यात आले असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत तृण धान्यापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणारे मोठ्या प्रमाणात नवउद्योजक तयार झालेले आहेत. यामध्ये वैयक्तिक उत्पादक, शेतकरी बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या यांचा समावेश आहे. महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील हापूस आणि राज्यातील इतर भागातील केशर, दसेरी आंबा उत्पादकांचा सामावेश राहणार आहे. तसेच महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातून मिलेट व धान्य उत्पादक सदर महोत्सवात त्याच्या शेतमालाची कोणत्याही मध्यस्थाविना थेट ग्राहकांना विक्री करणार आहे. या महोत्सवामध्ये सर्व प्रकारचे मिलेट्स जसे; ज्वारी, नाचणी, बाजरी, सावा, वरई, सामा, भगर, राळा उपलब्ध होणार असून या मिलेट्सचे प्रक्रियायुक्त पदार्थ जसे, नाचणी बिस्कीट, नाचणी पापड, ज्वारीच्या लाह्या, रोस्टेड ज्वारी/बाजरा, इडली मिक्स, कुटकिचे लाडू असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात नागपूरकरांना उपलब्ध होणार आहे.
ओरिजनल हापूस मिळणार
नागपूर शहरामध्ये हापूस आंब्याचा खूप खप आहे. मात्र विकत घेतलेला हापूस आंबा कुठून येतो? खरोखरच तो हापूस आंबा कोकणातील आहे का? खरा हापूस आंबा कसा ओळखावा, असे अंसख्य प्रश्न ग्राहकांना नेहमीच भेडसावत असतात. हे लक्षात घेऊन महोत्सवामध्ये बहुतांश आंबा उत्पादक हे भौगोलिक मांनाकन प्राप्त क्षेत्रातील राहणार आहेत. त्यांच्याकडून थेट ग्राहकांना अस्सल हापूस आंबा उपलब्ध होणार आहे. म.रा. कृषी पणन मंडळामार्फत महोत्सवात ५० ते ५५ स्टॉल उपलब्ध (50 to 55 stalls available) करून देण्यात आले आहेत.