हिंगोली (Narahari Jirwal) : जवळपास दोन दशकांपासून हिंगोली जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळालेला नाही. सोपस्कार म्हणून अधून-मधून जिल्ह्यात येणार्या पालकमंत्र्यांमुळे पालकमंत्री म्हणजे झेंडामंत्री, ही ओळख (Narahari Jirwal) ना. नरहरी झिरवाळांमुळे बदलेल का,अशी चर्चा सध्या ऐकायला येत आहे.
पालकमंत्र्यांची प्रमुख जबाबदारी म्हणजे नियोजनाची. जिल्ह्याची गरज ओळखून त्या अनुषंगाने शासनाकडून कामे मंजूर करून घेणे व ही कामे पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे, हे प्रामुख्याने करावयाचे काम. १५ ऑगस्ट, १७ सप्टेंबर व २६ जानेवारी या तीन शासकीय महोत्सवांना येऊन झेंडावंदन करण्यापुरते जे पालकमंत्री यायचे, ते ‘झेंडामंत्री’ (Narahari Jirwal) म्हणून ख्यातनाम झाले. ज्यांनी जिल्ह्यात लक्ष घातले त्यांचे ‘लक्ष्य’ वेगळेच समोर आले, जिल्हा नियोजन मंडळामार्फत केल्या जाणार्या कामांची गरज व गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून विशिष्ट विभागांची सतत आढावा बैठक घेणे म्हणजेच ‘पालकत्व’ अशी एक वेगळीच व्याख्या हिंगोलीकरांना समजली.
पालकमंत्री व तत्कालीन खासदारांनी एकमेकांची केलेली कौटुंबिक ‘विचारपूस’ त्यावेळी सामान्यांसाठी चर्चेचा विषय बनली होती. रस्ता नसलेल्या काही गावांना ‘सोलार स्ट्रीट लाईट’ मिळाले; तर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येपेक्षा अधिक कॅमेरे काही शाळांना मिळाले. या अद्भुत कार्यकलापांची ‘प्रयोगशाळा’ बनलेल्या हिंगोली जिल्ह्याला खरोखरचा पालकमंत्री (Narahari Jirwal) हवा आहे. हिंगोलीच्या बाबतीत ही निकड अधिक तीव्र इतक्यासाठी सुध्दा आहे की, जिल्ह्यात पुढारी बरेच आहेत, निवडून आलेले आमदार सुध्दा आहेत; परंतु ते एक किंवा दोन तालुक्यांचे सरंजामदार, अशा मर्यादेतच आहेत. संपूर्ण जिल्ह्यांचे नेतृत्व स्विकारून काम करणारा एकही नेता जिल्ह्यात नसल्याने ही पोकळी पालकमंत्र्यांनाच भरून काढावी लागणार आहे.
जिल्ह्यातून वाहणार्या एकमेव नदीला जमिनीखालून दुसर्या जिल्ह्यात नेण्याचा ‘रोडमॅप’ तयार आहे. याला आड येणारा (Narahari Jirwal) पालकमंत्री जिल्ह्याला हवा आहे. अपूर्ण असलेला सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनदरबारी आवाज उठविणारे पालकत्व जिल्ह्याला हवे आहे. अतिवृष्टी, रखडलेल्या जमिनींचा मावेजा, न मिळालेला पीकविमा शेतकर्यांना मिळवून देणारा पालकमंत्री शेतकर्यांना अपेक्षित आहे. उद्योग आणि शिक्षणांच्या बाबतीत विधवेचे कपाळ असलेल्या जिल्ह्याला सौभाग्याचे कुंकू लावणारा ‘पालक’ दोन दशकांपासून प्रतिक्षीत आहे.
राज्याच्या विधानसभेचे सक्षपणे अध्यक्षपद भूषविणारे नरहरी झिरवाळ या जिल्ह्याचे पालकमंत्री (Narahari Jirwal) झाले असल्याने जिल्हा वासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.सक्षम नेतृत्व शोधत असलेल्या जिल्हावासियांना नरांमधला हरि पावला तरच पालकमंत्री या व्याख्येला खरा अर्थ लाभेल, अशा भावना व्यक्त होत आहेत.