19 लाख 90 हजारांचा दंड; शाळा तात्काळ बंद करण्याचा शिक्षण विभागाचा आदेश
लातूर (Narayana E-Techno School) : शासन नियमानुसार अनधिकृत असलेल्या येथील अंबाजोगाई रोडवरील नारायणा ई-टेक्नो स्कूलला माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने 19 लाख 90 हजारांचा दंड केला असून हा दंड तात्काळ भरावा तसेच अनधिकृत असलेले (Narayana E-Techno School) शाळा तात्काळ बंद करावी असे आदेश 10 जानेवारी रोजी एका पत्रान्वये बजावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की लातूर शहरात यशोदा टॉकीज समोर, अंबाजोगाई रोडवर नारायणा ई-टेक्नो स्कूल नावाची शाळा चालते. ही शाळा अनधिकृत असून या शाळेची लातूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी 4 जुलै 2024 रोजी भेट देऊन तपासणी केली होती. तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला दिला होता. त्यावरून (Narayana E-Techno School) माध्यमिक शिक्षण विभागांनी 17 डिसेंबर 2024 रोजी या शाळेला पत्र देत शासन मान्यतेशिवाय चालणारी ही शाळा तात्काळ बंद करावी असे म्हटले होते. तरीही शाळा प्रशासनाने ही शाळा चालू ठेवली. त्यामुळे अनधिकृतपणे शाळा अद्याप सुरू असल्याने शाळेने आरटीई ऍक्ट 2009 च्या कलम 18 चा भंग केल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आरटीई ऍक्ट 2009 च्या कलम 18 नुसार शाळेस प्रथम दिवशी रू. एक लक्ष (Rs.1,00,000/-) आणि पुढील प्रत्येक दिवसास दरदिवशी रु.10,000/- प्रमाणे एकूण रु. 19,90,000/-(अक्षरी एकोणवीस लक्ष नव्वद हजार रु. मात्र) दंड आकारण्यात येत असल्याचे बजावले आहे. सदरील दंडाची रक्क्म ही खालील तात्काळ जमा करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.
तात्काळ प्रभावाने दि. 11 जानेवारी 2025 पासून आपली शाळा (Narayana E-Techno School) अनधिकृत असल्याने बंद करावी आणि संबंधित व अनुषंगिक सर्व अभिलेखे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती लातूर यांच्या सूचनेप्रमाणे नजीकच्या शाळेत तात्काळ हस्तांतरित करावीत. सबब सदर प्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी; अन्यथा पुढील कायदेशीर प्रशासकीय कार्यवाहीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, असेही संबंधित शाळेच्या प्राचार्यांना बजावले आहे.
पालकांमध्ये उडाली खळबळ…
संबंधित शाळेत जवळपास 300 वर विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची चर्चा आहे. इतके विद्यार्थी शिक्षण घेत असताना या शाळेला मान्यता नसल्याचे इतक्या उशिरा कसे काय उघड झाले? याबाबत आता चर्चा सुरू आहे. (Narayana E-Techno School) शाळा सुरू होतानाच शिक्षण विभागाने शाळांची तपासणी केली नव्हती काय? तसेच ही शाळा चालते हे लक्षात आल्यानंतर तात्काळ कारवाई का केली नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान शाळा मान्यतेशिवाय चालत असल्याचे लक्षात आल्याने पालकांमध्ये खळबळ माजली आहे.