नाशिक(Nashik):- महायुतीचे समर्थक व सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी भेट घेतली. आपण या लोकसभेचे उमेदवार असून सहकार्य करावे अशी भावना शांतिगिरी महाराजांनी व्यक्त केली. तर आ. कोकाटे यांनी मी महायुतीचा समर्थक व युतीचाच एक भाग असून माझ्या तुम्हाला शुभेच्छा असतील. पण मी मात्र महायुतीच्या उमेदवाराचाच प्रचार करणार असे स्पष्ट केले.
यावेळी शांतिगिरी महाराजांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराजांनी आमदार कोकाटे यांना महाप्रसाद दिल्यानंतर आपल्याला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. तथापि, महाराजांबद्दल आपल्याला प्रचंड आदर असून त्यांच्या भावना आपल्या लक्षात आल्या आहेत. परंतु, राजकारणात (politics) एखादी भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेपासून दूर जाता येत नाही, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे व विद्यमान खासदार हेमंतआप्पा गोडसे यांच्यात मोठी राजकीय चुरस आहे. परंतु या दोघांमध्ये शांतिगिरी महाराजांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. कारण शांतिगिरी महाराजांचे अनेक भक्त या दोन उमेदवारांमध्येच विभागले गेले आहेत.