परभणी (Parbhani Agricultural University) : उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसारणासाठीच्या केंद्रीय उपसमिती बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित टोमॅटो, मिरची, चिंच या वाणांना राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. टोमॅटो वाण पीबीएनटी – २०, मिरणी वाण पीबीएनसी – १७ आणि चिंचेचे शिवाई वाण यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
बैठकीमध्ये वाणांचे बियाणे उत्पादन साखळीत समाविष्ट करण्याची शिफारस केली. यामुळे शेतकर्यांना या पिकांच्या उच्च दर्जाच्या बियाणांची सहज उपलब्धता होईल व उत्पादन क्षमता वाढविता येईल. या वाणांच्या अधिसुचनेनंतर संबंधित वाण बियाणे प्रमाणण प्रणालीसाठी समाविष्ट केले जातील, असे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या पत्राद्वारे कळविले आहे. या नवीन वाणांच्या मान्यतेमुळे शेतकर्यांना अधिक दर्जेदार आणि परिणामकारक वाण मिळून उत्पादन वाढले. हिरव्या मिरचीचे वाण अधिक उत्पादन देणारे असून मराठवाडा विभागासाठी शिफारस करण्यात आली आहे. टोमॅटोचे वाण रब्बी हंगामातील लागवडीसाठी शिफारस करण्यात आले असून हे वाण किड विरोधी सहनशिल आहे. चिंचेचे शिवाई वाण प्रतिझाड आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारे आहे. उद्योगाची मागणी लक्षात घेता हे वाण महत्वाचे असून किड रोधक तसेच कोरडवाहू भागात उपयुक्त ठरणारे आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठद्वारा विकसित भाजीपाला व फळ पिकांच्या वाणांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये मिरची, टोमॅटो, चिंच या वाणांचा समावेश आहे.
परभणीच्या शेतकर्यांनी या वाणांचा लाभ घ्यावा
वनामकृवि विकसित या वाणांमुळे शेतकर्यांना लाभ होईल. शेतकर्यांसाठी या वाणांच्या विकासामुळे कृषी संशोधनातील विद्यापीठाचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी केले. वाण विकसित करण्यासाठी शास्त्रांनी केलेल्या प्रयत्नांचे अभिनंदन केले.