कारंजा(Washim):- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 6 ऑगस्ट रोजी दुपारी कारंजा तहसील कार्यालयावर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी साठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मागील तीन वर्षापासून सततचा पाऊस, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती व शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. अशा परिस्थितीत त्याला कर्जमाफीची आवश्यकता असल्याने विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शासनाकडे केली आहे.
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विना व्याजी कर्ज देण्यात यावे
मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शहरातील बायपास परिसरातील झाशी राणी चौकातून ढोल ताशांच्या निनादात या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर सारंग तलावा जवळून- शिवाजीनगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक(Dr. Babasaheb Ambedkar Chowk),जयस्तंभ चौक, असे मार्गक्रमण करीत तहसील कार्यालय येथे जाऊन मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. मोर्चादरम्यान सहभागींनी दिलेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान विद्यमान सरकारवर टीकेचे आसूड ओढले. सोबतच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी केली व सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करणे, शेतमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे वाढीव हमीभाव मिळणे, वन्य प्राणी व नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्वरित द्यावी, शेतीसाठी लागणारे बी-बियाणे कीटकनाशके व खते या वरील जीएसटी माफ करावी, विद्यार्थ्यांना जातीचे, उत्पन्नाचे दाखले(Income proofs), नॉन क्रिमिलियर(Non criminal) वेळेवर द्यावे, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विना व्याजी कर्ज देण्यात यावे, सन 2023-24 चा पिकविमा सरसकट देण्यात यावा, ग्रामीण व शहरी भागातील अतिक्रमणे नियमानुकुल करून घरकुलाचा लाभ द्यावा, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा मोफत देण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आक्रोश मोर्चात रा.कॉ चे नेते माजी आ.अनंतकुमार पाटील, डॉ. श्याम जाधव, अरविंद इंगोले,बाबुसिंग नाईक,श्रीधर कानकीरड,डॉ.विठ्ठल घाडगे,राजू अवताडे,वैशाली मेश्राम,किशोर लावरे,डॉ.अशोक मुंदे, डॉ.रमेश चंदनशिव, रमेश जाधव, डॉ.जितेंद्र डोंगरे, सुमित पाटील, इम्रानभाई फकिरावाले, भोजराज चव्हाण, सौ.ज्योतीताई गणेशपुरे, मनोज कानकीरड, काशीराम राठोड, दिलीप रोकडे, रउफ मामू, जहीर भाई, घनश्याम पाटील, सौ.मायाताई लाहे, नाझीर शेख, मुसावीर भाई यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.