वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत
जिंतूर तालुक्यातील महावितरणचे कार्यालयाचे दुर्लक्ष…!
जिंतूर तालुक्यातील महावितरणचे कार्यालयाचे दुर्लक्ष…!
परभणी (Jintur Mahavitaran) : जिंतूर शहरासह परिसरात मंगळवारी २० मे रोजी अचानक सुरू झालेल्या भीषण वादळी पावसामुळे जिंतूर शहरवाशीयांना दोन दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे. पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, त्यामुळे जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वादळ व पावसामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या असून, अनेक ठिकाणी खांब कोसळले आहेत. परिणामी, संपूर्ण शहरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाकडून अद्यापही विजेची पूर्वस्थिती करण्याचे कार्य सुरू असून, नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. (Jintur Mahavitaran) वीज नसल्यामुळे वातावरणातील उकाड्याने त्रस्त नागरिकांची झोप हरवली आहे. रात्रीचे तापमान प्रचंड वाढल्यामुळे घामाघूम परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच वाढलेले डासांचे प्रमाण हा त्रास अधिकच वाढवणारा ठरत आहे. विजेअभावी घरांतील फॅन्स, कूलर्स आणि अन्य सुविधा बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
याशिवाय, विजेअभावी मोबाईल टॉवर्स देखील बंद पडले आहेत. परिणामी भ्रमणध्वनी सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, (Jintur Mahavitaran) नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोणालाही संपर्क करता न आल्यामुळे अनेकांचे महत्त्वाचे व्यवहार ठप्प झाले आहेत. प्रशासनाकडून विजेची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अजूनही काही भागात वीजपुरवठा सुरू करण्यात यश आलेले नाही. नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निसर्गाच्या कोपामुळे उद्भवलेल्या या संकटातून लवकरात लवकर सुटका व्हावी, अशीच सध्या जिंतूरकरांची अपेक्षा आहे.
तुटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे दुरुस्तीच्या कामाला विलंब
सततच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरासह परिसरातील बहुसंख्य ठिकानावरील विद्युत खांब वाकले होते शिवाय वेगवेगळ्या ठिकाणावरील विद्युत तारा तुटून पडले होते. परंतु मागील दोन दिवसांपासून शहरातील नेमगिरी फिडर आणि हुतात्मा स्मारक फिडर अंधारात आहे. कारण (Jintur Mahavitaran) महावितरण कार्यालयामध्ये दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय तुटपुंजी असल्यामुळे दुरुस्तीच्या कमला कमालीचे वेळ लागत आहे परिणामी जिंतूर वाशियाना नाहक गैरसोयीच्या सामोरे जावे लागत आहे.