विद्यार्थ्यांचीही जाण्या – येण्याची गैरसोय !
मानोरा (Neglect of Rural Passengers) : महाराष्ट्र परिवहन महामंडळाची मानोरा तालुक्यावर विशेष वक्रदृष्टी असून ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात अहवेलना होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
अकांक्षित वाशीम जिल्ह्यातील मानोरा हा तालुका अति मागासलेला म्हणून विदर्भात ओळखला जातो. आदिवासी, बंजारा बहुल असलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी व नागरिक कामकाजासाठी शहरात येतात. मात्र अनेक गावातील पूर्वी सुरू असलेली ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद अवस्थेत आहे. परिवहन विभागाकडून सुरू होत नसल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात जाण्यासाठी बसेस नाहीत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आलेली आहे. तर अनेक पालक आपल्या पाल्यांना खाजगी वाहनाने आर्थिक भुर्दंड सोसून शहरात शिक्षणासाठी पाठवित आहेत. तसेच छोटे मोठे व्यापाऱ्यासह सर्व सामान्य नागरिक तसेच आजारी रुग्णांनाही बसेस नसल्यामुळे उपचारासाठी शहरात जाणे दुरापास्त होत आहे. ग्रामीण भागातील बसेस बंद करण्याच्या परिवहन मंडळातील अधिकाऱ्यांच्या तुघलकी कारभारामुळे ग्रामीण भागातील प्रवाश्यांना वाऱ्यावर सोडले आहे. बसेस बंद असल्यामुळे नागरिकांना एकतर पायी जावे लागते, किंवा खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत आहे.
पालकमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज !
आर्थिक सक्षम असलेले नागरीक खासगी वाहनाद्वारे ये – जा करू शकतात, मात्र काही गरिबाकडे कुठलेही वाहन नसल्यामुळे त्यांना केवळ एस टी बसेसचा प्रवास करणे अनिवार्य असताना ग्रामीण भागात कुठल्याही बस फेऱ्या सुरू नसल्यामुळे ग्रामीण प्रवाशांची मोठी अहवेलना विद्यार्थ्यांची होत आहे. याकरीता पालकमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.




