परभणी/गंगाखेड(Parbhani):- दारूचे सेवन(Alcohol consumption) करून वाहन चालवित नव वर्षाचे स्वागत करू नये असे आवाहन गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी करत रविवार २९ डिसेंबर रोजी रात्री केलेल्या नाका बंदीत ७ वाहन चालकांविरुद्ध केलेल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या (Drunk and Drive) कार्यवाही करून अन्य १५ वाहन चालकांविरुद्ध १४५०० रुपये दंड आकारला आहे.
परभणीतील गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांचे आवाहन..!
दारूच्या नशेत होणारे वाहन अपघात रोखण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड उपविभागा अंतर्गतच्या गंगाखेड, सोनपेठ व पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार दि. २९ डिसेंबर रोजी नाकाबंदी पाईंटवर नियुक्त पोलीस अधिकारी व अंमलदारांनी वाहनांची तपासणी करत दारूचे सेवन करून नशेत वाहन चालविणाऱ्या एकुण ७ वाहन चालकांविरूध्द ड्रंक अँड ड्राईव्हची कार्यवाही करून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ वाहन चालकांविरुध्द मोटार वाहन कायाद्यानुसार कार्यवाही करून एकुण १४५०० रूपये दंड आकारला आहे. त्याच प्रमाणे नवीन वर्षाचे स्वागत करतांना दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे घडणाऱ्या अपघातांवर अंकुश लावण्यासाठी सोमवार दि. ३० डिसेंबर ते बुधवार दि. १ जानेवारी २०२५ दरम्यान विशेष मोहीम राबवून दारूचे सेवन करून नशेत वाहन चालविणाऱ्या वाहन धारकांविरुध्द व वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द पोलीस विभागाकडून कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगत २०२४ या वर्षाला निरोप देऊन नववर्ष २०२५ चे स्वागत करताना दारूच्या नशेत वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देऊ नये.
ड्रंक अँड ड्राईव्हची ७ जणांवर कार्यवाह
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरुद्ध वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देत अपघात टाळण्यासाठी दारूचे सेवन करून वाहन चालवू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या मोहिमेत गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहभाग राहणार आहे.