अॅग्रीस्टक करताना सातबारा दाखवते वनविभाग व जुनीच नावाची नोंद
कुनघाडा रै (Farmer ID) : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतजमीन मालकांसाठी शेतकरी फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य केल्यामुळे स्वतःची फार्मर आयडी तयार करण्यासाठी चामोर्शी तालुक्यात शेतकर्यांची लगबग सुरु झाली असून, जवळच्या शेतू केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. वडीलोपार्जीत जुनी शेतजमीन व जुनी फेरफार झालेली शेतजमिन इत्यादींची (Farmer ID) फार्मर आयडी प्रक्रिया सफल होत आहे. मात्र वनविभागाकडून वनपट्टे मिळालेल्या वनजमिनी व नवीन फेरफार झालेल्या शेतजमिनींचे फार्मर आयडी तयार करताना फार मोठ्या अडचणी येत आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार फार्मर आयडी शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जात आहे. सदर पुरावा तयार करण्यासाठी शेतकर्यांची तलाठी कार्यालयातून सातबारा गोळा करण्यापासून सेतू केंद्रापर्यंतची धावपळ सुरू आहे. (Farmer ID) फार्मर आयडी नसल्यास शेतकरी कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार या भितीपोटी शेतकरी जीवाचा आटापिटा करीत आहेत.. जे शेतकरी ओळख क्रमांक नोंदणी पासून वंचित आहेत त्यांनी तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ज्यांच्या सातबार्यात कसलीही त्रुटी नाही अशा बर्याच शेतकर्यांच्या आयडी तयार झाल्या आहेत. मात्र वनपट्टे धारक व नव्याने फेरफार झालेले शेतकरी आयडी प्रक्रियेत असफल ठरत ते अद्यापही नोंदणी पासून वंचित आहेत.
वनपट्टे मिळालेल्या जमिनीचे अॅग्रीस्टॅक करताना जमीन सिलेक्ट केल्यानंतर वनविभाग अशी नोंद दाखवत आहे तर नवीन फेरफार झालेल्यांच्या शेतजमिनीमध्ये सुध्दा जुन्याच नावाची नोंद आहे. त्यामुळे वनपट्टे धारक व नवीन फेरफार झालेले शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ज्या शेतकर्यांच्या (Farmer ID) आयडी तयार झाल्या अशा बर्याच शेतकर्यांना सेतू केंद्रातून नुकत्याच आयडी वाटप करण्यात आल्या आहेत. मात्र वनपट्टे धारक व नवीन फेरफार झालेल्या शेतकर्यांच्या फार्मर आयडी अद्यापही तयार झाल्या नसल्यामुळे महसूल व कृषी विभाग यावर काय उपाययोजना करणार याकडे आयडी पासून वंचित असलेल्या शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
कुनघाडा रै च्या मंडळ अधिकारी भूरसे यांच्याशी संपर्क साधला असता वरून साईटची समस्या असल्यामुळे अडचणी येत असून, महसुलाच्या प्रत्येक बैठकीत हा विषय मांडला जात असून, सेतू केंद्रातून सुध्दा पाठपुरावा केला जात आहे. ज्या शेतकर्यांची फार्मर आयडी झाली नाही अशा शेतकर्यांना माहिती देऊन त्यांची यादी तहसील कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी प्रतिक्रिया मंडळ अधिकारी भूरसे यांनी दिली.