मसलगा येथे तीन चोरांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात; एक फरार..
निलंगा (Nilanga Crime) : गोकुळाष्टमीचा कार्यक्रम संपल्यानंतर झोपण्यापूर्वी दुकान मालक मोबाईलमध्ये आपल्या दुकानातील सीसीटीव्ही चेक करत असताना कोणीतरी दुकानाच्या मागे जात असल्याचे दिसले. अन् दुकानदारांनी ग्रामस्थांसह स्वतः दुकानाकडे धाव घेऊन (Nilanga Crime) चार चोरट्यांपैकी तीन चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देल्याची घटना मंगळवारी (दि. २७) मध्यरात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील मसलगा येथील व्यापारी दत्तात्रय शेषराव पिंड यांचे तालुक्यातील मसलगा पाटीवर लातूर-जहिराबाद महामार्गावर मसलगा अॅग्रो नावाने खते, बियाणांचे दुकान आहे. मंगळवारी (दि. २७) गोकुळाष्टमी निमित्त पिंड यांच्या घरी कार्यक्रम होता. (Nilanga Crime) मध्यरात्री एक वाजता कार्यक्रम संपल्यानंतर दत्तात्रय पिंड यांचा मुलगा धनंजय पिंड याने झोपण्यापूर्वी सहज दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या मोबाईलवर चेक केले. त्याच क्षणी कोणीतरी दुकानाच्या पाठीमागे गेल्याचे दिसून आले. ते चोरटेच असावेत, असा अंदाज व्यक्त करुन तात्काळ दत्तात्रय पिंड यांनी तुळशीदास साळुंके, ज्ञानेश्वर पिंड, बबन चामे, नामदेव चामे, रविकिरण पिंड, आबासाहेब पाटील अदी ग्रामस्थांना घेऊन दुकान गाठले.
गावातून गाड्या येत असलेले पाहून चोरटे त्यांनी आणलेल्या अशोक लिलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक एम.एच. २५ ए.जे ३८५८ या क्रमांकाच्या टॅम्पोत बसून पळून जाण्याच्या बेतात असताना ग्रामस्थांनी त्यांना थांबले. तेव्हा भांबवून गेलेल्या चोरट्याने डिझेल संपले म्हणून थांबलोय असे सांगितले. गाडीतील डिझेल तपासणी केले असता टाकी फुल्ल भरुन आढळून आली. दुकानाच्या पाठीमागे जाऊन दत्तात्रय पिंड यांनी पाहिले असता सात सोयाबीनचे कट्टे पत्रा काढून बाहेर काढल्याचे निदर्शनास आले. तेव्हा ग्रामस्थांनी तिघांना चोप देताच दुकान आपणच फोडल्याचे त्यांनी कबूल केले.
आणखीन एकजण ऊसातून पळून गेल्याचेही त्या चोरट्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना कळवले असता तात्काळ (Nilanga Crime) घटनास्थळी निलंगा पोलीस दाखल होऊन तिघांना ताब्यात घेतले. सदरील घटनेप्रकरणी आरोपी शहाजी मच्छिंद्र माने, सागर मच्छिंद्र माने दोघे रा. कोळीवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव,लक्षण गोविंद माने रा. सायखान चिंचोली ता. निलंगा जि.लातूर, फरार आरोपी सुभाष दिलीप स्वामी रा.आदर्श कॉलनी च्या पाठीमागे, उमरगा अशा या चार जणांविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून पोलिसांनी एक अशोक लिलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक एम.एच. २५ ए.जे ३८५८ या क्रमांकाचा वाहन ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी पुढील तपास निलंगा पोलीस ठाण्याचे पोकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.