आ.संजय खोडके, दोन उत्कृष्ट महिला शेतकरी, क्रीडापटू व विद्यार्थ्यांचा सत्कार
अमरावती (Nitin Gadkari) : श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) स्मृती पुरस्कार २०२४’ ने केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी (Nitin Gadkari) यांना सन्मानित करण्यात आले.रु.पाच लक्ष रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी त्यांना सन्मानित केले. संस्थेच्या या पाच लक्ष रुपयाच्या पुरस्कारात स्वतःच्या २० लक्ष रुपयांची भर घालून होणाऱ्या २५ लक्ष रुपयात संस्थेतर्फे दरवर्षी पाच शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, असे ना. गडकरी (Nitin Gadkari) यांनी यावेळी जाहीर केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन प्र. देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री (Nitin Gadkari) ना. नितीनजी गडकरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तर मा. खासदार शरदचंद्र पवार हे प्रमुख अतिथी म्हणून आभासी पद्धतीने उपस्थित होते. राज्यसभा सदस्य खा. डॉ. अनिल बोंडे, अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे आणि अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके, माजी मंत्री प्रवीण पोटे, श्रीमती कमलताई गवई हे या सोहळ्याला अतिथी म्हणून उपस्थित होते.
या सोहळ्यात मा. खासदार शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेल्या दाननिधीतून पातुर तालुक्यातील सौ.वंदना देविदास धोत्रे या विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिलेला ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. रोख रु.१,११,१११/- (रुपये एक लक्ष अकरा हजार एकशे अकरा), स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, केंद्र सरकारने डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती प्रीत्यर्थ प्रसारित केलेले १२५ रुपयांचे नाणे, साडी, चोळी, शाल व श्रीफळ असे शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्काराचे स्वरूप होते. आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनेभंडारा जिल्ह्यातील महालगाव येथील सौ.वंदना राधेश्याम वैद्य यांना ‘श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार २०२४’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले रु.५१०००/- रोख, स्मृतिचिन्ह, साडी,चोळी, शाल व श्रीफळ असे ‘श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्काराचे स्वरूप होते.
वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मिथिला भालचंद्र कवीश्वर व संस्कृती शैलेश राठोड यांना श्रीमती विमलाबाई देशमुख (वैद्यकीय शिक्षण)अभ्यासवृत्ती प्रदान करण्यात आली तर कृषी शाखेच्या विद्यार्थिनी वैष्णवी आदिनाथ मानवटकर आणि वैष्णवी किसान कदम, समीक्षा दिलीप नागापुरे, धनश्री गजानन मुळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (कृषी शिक्षण) अभ्यासवृत्ती देण्यात आली. आणि माध्यमिक शाळेतील खेळाडू विद्यार्थी सौम्य राजेंद्र राऊत व विद्यार्थिनी आयुषी धर्मेंद्र दिवाण क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय प्राविण्याबद्धल ‘ (Dr. Punjabrao Deshmukh) डॉ.पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्कार’ देखील या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या कु. दीप्ती आशिष काळमेघ हिला संस्थेतर्फे ती लक्ष रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
नवनियुक्त विधान परिषद सदस्य आ. संजय खोडके यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले तर कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी आभार मानले.पुरस्कार वितरण सोहळ्याचे संचालन डॉ.व र्षा चिखले व डॉ. मनीष गायकवाड यांनी केले. डॉ. किशोर फुले यांनी ना.गडकरी यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले.डॉ.राजेश उमाळे यांच्या नेतृत्त्वात सांगळूदकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व गौरव गीत सादर केले.
पुरस्कार वितरण सोहळ्याला संस्थेचे उपाध्यक्ष सर्व श्री. अॅड.गजाननराव पुंडकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष श्री. दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य सर्व श्री. हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, प्रा. सुभाषराव बनसोड, संस्थेचे सचिव डॉ. वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य सर्व श्री. प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, नरेशचंद्र पाटील, डॉ. पी. एस.वायाळ, डॉ. अमोल महल्ले हे प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्याला संस्थेचे आजीव सदस्य, अधिकारी व कर्मचारी वृंद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) या नावात खूप मोठी शक्ती असून शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशातील कृषी व शिक्षण क्षेत्राला एक दिशा दिली. त्यांच्या नावाच्या या पुरस्कारामुळे आपल्याला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल.येणाऱ्या काळात विदर्भ सुखी आणि संपन्न झाला पाहिजे यासाठी आपण सर्व काम करू. आपल्याला स्मार्ट शहरांची नव्हे तर स्मार्ट खेड्यांची गरज आहे,असे (Nitin Gadkari) ना.गडकरी सत्काराला उत्तर देताना म्हणाले.
राजकारणी लोक फक्त पुढच्या निवडणुकीचा विचार करतात तर द्रष्टे लोक शतकानुशतकाचा विचार करतात.विकास करायचा असेल तर जात,धर्म, पक्ष याच्या वर उठून विचार केला पाहिजे.जे जे चांगले समाजोपयोगी कार्य करतात त्यांना मदत केली पाहिजे. इतिहास यासाठी महत्त्वाचा आहे की वर्तमानकाळात तो आठवून भविष्यात कार्य करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. असेही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. सोहळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहिलेले राष्ट्रीय नेते मा.शरदचंद्र पवार यांनी ना.गडकरी यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना व सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
ना. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून त्यांनी विविध सामाजिक क्षेत्रात जे कार्य केले ते फार मोठे आहे.कोणताही पक्षभेद व जातीभेद न ठेवता ते कार्य करत आले आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा मोठा आधारवड म्हणजे गडकरी आहेत, या शब्दात कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी ना. गडकरी (Nitin Gadkari) यांचा गौरव केला. आपल्या प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषणातून पुरस्कार सोहळ्याची विस्तृत भूमिका मांडताना त्यांनी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा आपल्या भाषणातून गौरव केला.