‘रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषद
ना. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Nitin Gadkari) : येत्या २ वर्षात भारतीय उद्योगक्षेत्रातील महत्वाचा असा लॉजिस्टिक खर्च २ टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे प्रयत्न असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे (Artificial Intelligence) भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक खर्च, पॅकेजिंग, उत्पादन, वेळेवर वितरण आणि उत्पादन व सेवेचा पुरवठा यामध्ये महत्त्वाचे बदल होऊन भारतीय उद्योगक्षेत्र जागतिक स्तरावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट, नागपूर शाखेतर्फे आयोजित ‘रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या परिषदेला ते संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी आर्थिक व्यवस्था बनवण्याबरोबरच आत्मनिर्भर भारत बनवणे आपले उद्दिष्ट आहे. यासाठी तंत्रज्ञानाची योग्य निवड, तिचा योग्य वापर आणि समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा होणारा फायदा गरजेचे आहे. भारतात तरुण वर्गाची संख्या ही लक्षणीय अशी असून हा तरुण वर्ग भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
भारतीय उद्योगाला आपली वितरण प्रणाली अजून विकसित करून वेळेला सर्वाधिक महत्व या तत्त्वाला प्राथमिकता दिली पाहिजे. कालबद्ध वितरण उत्तम पॅकेजिंग लॉजिस्टिक आणि साठवण्याची क्षमता व सर्वच घटकांवर उद्योगविश्वाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे (Nitin Gadkari) गडकरींनी याप्रसंगी नमूद केले. उत्पादन वितरण मालपुरवठा या क्षेत्रामध्ये (Artificial Intelligence) आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली राबविण्यासाठी त्या क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी तंत्रज्ञान यांना योग्य असे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले तरच ही प्रणाली उत्तमरित्या काम करू शकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बहुआयामी मुद्द्यांवर होईल चर्चा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट, नागपूर शाखेतर्फे आयोजित रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ (Artificial Intelligence) आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन दिवसीय परिषदेमधून पारंपरिक पुरवठा पद्धतीमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीद्वारे शाश्वत, विकसित, बहुआयामी अशे मुद्दे चर्चिले जातील, असा विश्वास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट नागपूरचे संचालक डॉ. व्यंकटरामन यांनी व्यक्त केला.