औसा (Nitin Gadkari) : खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र काळापासून ग्रामीण रस्ते विकासाचे काम केले असते तर शेतकऱ्यांना आपला भाजीपाला व दुध शहरात विक्रीसाठी घेऊन जाता आला असता. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला असता तर शेतकरी आत्महत्या कशाला झाल्या असत्या? असा सवाल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला. महायुतीच्या प्रचारार्थ किल्लारी येथे (दि.१२) रोजी आयोजित सभेत नितीन गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना अन्नदाता नाही तर ऊर्जादाता म्हणून पुढे आणून वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर व गाव विकासाला चालना देण्याचे काम भाजपा सरकारच्या १० वर्षांच्या काळात झाले. ही सरकारची सर्वात मोठी उपलब्धता आहे. राजकारणात जनता मालक तर लोकप्रतिनिधी सेवक आहे. म्हणून आपण लोकांची सेवा करायची आहे. त्यांचे जीवन सुसह्य करायचे आहे. येथील आर्थिक व सामाजिक परिस्थिती बदलायची आहे. गाव, गरीब, मंजूर, शेतकऱ्यांचे कल्याण करायचे आहे, असेही ते (Nitin Gadkari) म्हणाले.
जेव्हा विकासावर बोलता येत नाही तेंव्हा लोकांना कन्फ्युज करण्याचे काम केले जाते. लोकसभेत अशा प्रकारे भाजपच्या संदर्भात चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरविण्याचे काम काँग्रेसने केले. दलित व मुस्लिम समाजात संभ्रम व भिती निर्माण करण्याचे काम करण्यात आले. ज्या काँग्रेस पार्टीने घटना तोडण्याचे काम केले, आज तेच घटना घेऊन फिरत आहेत, अशी टीका यावेळी गडकरींनी केली. देश स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालिन काँग्रेस सरकारने तेव्हा केवळ कंपन्या उभारण्याचे काम केले. त्या सर्व पुन्हा डबघाईला आल्या, अशी टीका केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.