अहमदपूर (Latur) :- अहमदपूर तालुक्यातील तळेगाव शिवारातील शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसा वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) नसून त्या ट्रिब्युनल कोर्टाच्या आहेत. दरम्यान याबाबतचे महसूलला कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड नसल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले आहे. तळेगावच्या सर्वे नंबर 15 मध्ये दर्गा तकिया यांच्या नावे 8 हेक्टर 17 आर.ची नोंद असल्याचे महसूल प्रशासनाने यांनी सांगितले.
महसूलकडे दर्गा तकियाच्या नावे 8 हेक्टर 17 आर.ची नोंद!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसांपूर्वी वक्फ बोर्डाच्या तळेगाव शिवारातील 300 एकर वरील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटिसा आल्यासंबंधी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत शहानिशा केली असता सदर नोटीस वक्फ बोर्डाच्या नसून त्या औरंगाबाद येथील ट्रिब्यूशनल कोर्टाच्या (TRIBUTIONAL COURT) आहेत. पटेल इरफान पिता समर अहमद यांनी वरील न्यायालयात दावा क्रमांक 17/2024 अन्वये त्यांच्याकडे असलेले जुने मुंतखब रेकॉर्ड 13 28 फसली म्हणजेच अंदाजे 1938 च्या जुना दस्तावेज आधारे सदर दावा दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे पंजोबा सय्यद अमीर सय्यद अमर यांना त्या काळच्या सरकारने सदर जमीन दान दिल्याचा उल्लेख केला आहे. याबाबत नमुना नंबर 3 मध्ये त्याची नोंद आहे.
गाव पाहणी नकाशा नमुना 16 व 23 मध्ये ही नोंद असल्याचे त्यांच्या दाव्यात स्पष्ट केले
सदर जमिनीतील नऊ सर्वे नंबर असून त्यातील 193.85 आर जमिनीवर हक्क सांगितला आहे. मात्र महसूल रेकॉर्डिंग तपासले असता त्यांनी दिलेल्या सर्वे नंबर वर इतर सर्व शेतकऱ्यांचे मालकी व हक्कात नाव आहे. केवळ सर्वे नंबर 15 वरील आठ हेक्टर 17 आर जमिनीवर ती दर्गा सय्यद अमीर अली ताकिया अशी नोंद असून सदर जमीन ही त्यांच्या ताब्यात आहे. मात्र उर्वरित कुठलीही जमीन त्यांच्या नावे नसल्याचे महसूल पुराव्यावरून दिसून येत आहे. याबाबत वक्फ बोर्डानेही सदर जमिनी संदर्भात नोटीसा दिल्या नसून त्या ट्रिब्युनल कोर्टाने दिल्या असल्याचे स्पष्ट केले आहे.