Oath Ceremony : आज होणाऱ्या शपथविधीला उद्धव ठाकरे,शरद पवार यांच्यासह अनेक जण अनुपस्थित राहणार. पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेणार
भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्याचं भव्य-दिव्य आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. मात्र या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नसल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आणि भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले.
१३ दिवस चालेल्या खलबतांनंतर आज नव्या सरकारचा शपथविधी
निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल १३ दिवस चालेल्या खलबतांनंतर आज नव्या सरकारचा शपथविधी होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार(Sharad Pawar), उद्धव ठाकरे(Udhav Thakre) आणि राज ठाकरे(Raj Thakre) यांना फोन करून निमंत्रित केलं होतं. परंतु या नेत्यांना अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.