वाहतूक व्यवस्था पूर्णत: ठप्प
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (OBC Reservation) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर राज्य शासनाने २ सप्टेंबर रोजी जीआर काढून हैदराबाद गॅजेट लागू केला. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी झाल्याने प्रबळ असलेल्या मराठा समाजासमोर छोट्या जातींचा निभाव लागणे शक्य नाही. त्यामुळे (OBC Reservation) ओबीसी समाजामध्ये रोष व्याप्त असून सर्वत्र आंदोलने होत आहे. दरम्यान शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेला मोर्चा संविधान चौकात धडकला. मोर्चात पिवळ्या रंगाचे फेटे घालून हजारो ओबीसी बांधव रस्त्यावर उतरल्यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. आंदोलनकर्त्यांनी ‘आरक्षण आमचा हक्क आहे’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून पर्यायी मार्गाची व्यवस्था केली, तरी पंचशील चौक, झाशी राणी चौक आणि व्हेरायटी चौक येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
महाराष्ट्रातील (OBC Reservation) ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत संविधान चौकात ओबीसी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार प्रशांत पडोळे, प्रतिभा धानोरकर, श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माणिकराव ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आमदार रामदास मसराम, बाळासाहेब मांगरुळकर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, रासपचे महादेव जानकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे उपस्थित होते. या मोर्चात बोलताना काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
या (OBC Reservation) आंदोलनादरम्यान, वडेट्टीवार यांनी इशारा दिला की, ‘राज्य सरकारने जर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवला नाही, तर पुढील टप्प्यात मुंबई, ठाणे आणि पुणे शहर जाम करण्याची आमची तयारी आहे. ‘मोर्चाचा समारोप संविधान चौकात झाला. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनात राज्यभरातून हजारो ओबीसी बांधवांनी सहभाग घेतला. आता पुढील दिशा राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. मोर्चासाठी यशवंत स्टेडियम आणि संविधान चौकात व्यासपीठ उभारण्यात आले होते. स्टेजवर ‘२ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द करा’ आणि ‘ओबीसी आरक्षणाचा हक्क – ओबीसी आरक्षण बचाव’ असे फलक झळकाविण्यात आले आहेत.
आंदोलनकर्त्यांचा ठाम आग्रह आहे की, मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र (OBC Reservation) देण्याचा निर्णय हा अन्यायकारक असून, तो ओबीसी समाजाच्या हक्कांवर घाला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘आजचा मोर्चा हा एक ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे.’ यावरून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. वडेट्टीवार यांनी सांगितले की, ‘सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेला जीआर हा ओबीसी समाजाच्या मुळावर घाव आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे हक्क हिरावले जात आहेत. त्यामुळे तो जीआर तात्काळ रद्द झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. ओबीसी समाजाकडून असा इशारा देण्यात येतोय की जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर यापुढे लढा अधिक उग्र आणि व्यापक स्वरूप घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.
समाजासमाजात भांडणे लावण्याचे काम
मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे, असे असताना या सरकारमधील सहकारमंत्री म्हणतो, शेतकर्यांना कर्जमाफीची सवय लागली आहे. आम्ही निवडणुकीत आश्वासन देत असतो यातून सरकारची खरी नियत दिसत आहे. हे सरकार समाज समाजात भांडण लावत आहे. दुसरीकडे शेतकर्यांना भिकेला लावत आहे. यांना शेतकरीच जागा दाखवेल अशी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
नागपूरच्या रस्त्यावर उतरले ओबीसींचे पिवळे वादळ
विदर्भातील विविध जिल्ह्यांतील सकल ओबीसी संघटनांनी या मोर्चासाठी तयारी केली होती. यशवंत स्टेडियम इथून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. पंचशील चौक, व्हेरायटी चौक इथून मोर्चा हळूहळू संविधान चौकाच्या दिशेने निघाला. नागपुरातील रस्त्यावर ओबीसींचे पिवळे वादळ आज दिसले. लोकांनी मोर्चात जय ओबीसी जय संविधान, ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे अशा घोषणा दिल्या.