कॅनॉलमध्ये जाळलेल्या मृतदेहाची ओळख पटली; ६ आरोपींना अटक
अमरावती (Arvi Youth Murder) : वरली मटक्याच्या पैशावरून वाद होवून युवकाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पथ्रोट पोलिसस्टेशन हद्दीतील कॅनॉलमध्ये टाकून जाळल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी काही तासातच छळा लावून मुख्य आरोपीसह ६ जणांना अटक केली आहे.
टिकेश प्रशांत महाजन (२८) रा. गणपती वार्ड आर्वी, प्रशांत हरिचंद्र महाजन (५९) रा. गणपती वार्ड आर्वी, शुभम मोहनलाल रॉय (२८) रा. बुधवारा अंजनगाव सुर्जी, अली अजगर सब्दर हुसेन (२८) रा. जाजू वाडी आर्वी, हर्षित प्रकाश गौर (१९) रा. भोईपुरा अंजनगाव सुर्जी व नीखिल दिपचंद गौर (३२) रा. भोईपुरा अंजनगाव सुर्जी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ११ फेब्रुवारीरोजी वाघडोह परिसरातील खोडगाव मार्गावर मारोती जहांनपूर शेतशिवारात एका अनोळखी इसमाचे प्रेत जाळलेल्या अवस्थेत दिसून आले.
पथ्रोट पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून तपास सुरू केला होता. (Arvi Youth Murder) घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेला दिले. गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हे प्रगटीकरण पथक गठित करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.
घटनास्थळावरील पुरावे व गोपनिय माहितीच्या आधारे ११ फेब्रुवारीरोजी रात्री अंजनगाव सुर्जी येथे राहणारा पद्मश्री हॉटेलचा मालक शुभम रॉय हा त्याच्या पांढर्या रंगाच्या गाडीने हॉटेलवरील कामगारांसह खोडगाव रोडने ये-जा करीत असताना दिसला. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र गुन्ह्याची कबुली देऊन घटनाक्रम सांगितला.शुभम रॉयचा मामेभाऊ टिकेश महाजन रा. आर्वी याचे वडील प्रशांत महाजन याला शेख शाहरूख शेख रऊफ याने पैशाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली होती.
त्यामुळे आरोपी प्रशांत महाजन याचा मुलगा टिकेश व त्याचा मित्र अली अजगर रा. आर्वी यांनी मिळून शेख शाहरूखला जीवाने मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृतकास टिकेशने चारचाकी वाहनाने आर्वी येथून अंजनगाव सुर्जी येथील शुभम रॉय याला मदतीला घेऊन प्रेताची विल्हेवाट खोडगाव रोडवरील कॅनॉलमध्ये टाकून व जाळून लावली. पोलिसांनी आरोपी जवळून ५ लाख रुपयांची कार, ७ मोबाईल असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही (Arvi Youth Murder) कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, सहा. उप पोलिस अधीक्षक मनिष ठाकरे, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, अंजनगावचे पोलिस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक अनंत वडतकर, प्रभारी अधिकारी रहिमापूर अभय चौथनकर, प्रभारी अधिकारी पथ्रोट व तेथील स्टॉपमधील सचिन पवार, सागर हटवार, नितीन इंगोले यांनी केली आहे.




