परभणी(Parbhani) :- मागील अनेक वर्षापासून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणारा विकास थांबला. रविवारी ४७० कोटींच्या कामांना पालकमंत्री संजय बनसोडे यांनी ऑनलाईन बैठकीत मंजुरी दिली. परंतु कोणत्या कामांना मंजुरी देत आहेत त्या याद्या सदस्यांना न दिल्याने संतोष देशमुख यांनी आक्षेप घेतला असून ऑनलाईन बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नियोजनाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे.
पालकमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत एका सदस्याचा आक्षेप
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यापूर्वीही अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांच्या याद्या कधी प्रकाशित केल्या गेल्या नाही.
नियोजनाच्या याद्यीला मंजुरी देताना सर्व सदस्यांना विश्वासात घेवून विकास कामांना मंजुरी दिली गेली. मागील दोन वर्षापासून जिल्हा नियोजनाचा निधी हा काही कारणास्तव थांबविला गेल्याने विकास कामांची गती थांबली. न्यायालयीन प्रक्रियेत निधी अडकल्यानंतर नवीन पालकमंत्री संजय बनसोडे यांनी ४७० कोटींचे नियोजन केले. ४७० कोटींची विकास कामे ही जिल्ह्यात होणार आहेत. या नियोजनाच्या याद्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तयार करण्यात आल्या. रविवार २५ ऑगस्ट रोजी ऑनलाईन (Online)बैठकीतून ४७० कोटींच्या कामांना मंजुरी देखील दिली. परंतु सदस्य संतोष देशमुख यांनी याद्या न मिळाल्याने आक्षेप घेवून बैठकीचा व्हिडिओ व्हायरल केला. सदस्यांना याद्या न दिल्याचे कारण काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परत जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद वाढल्यास विकास कामांची गती कमी होणार हे निश्चित.
न्यायालयात दाद मागणार – संतोष देशमुख
यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत यांनीही नियोजन बरोबर न करता टक्केवारीने पैसे घेवून निधीचे वाटप केल्याचा आरोप होता. काहीजण कोर्टात गेल्याने निधी वाटप रखडले. आता पुन्हा ४७० कोटींचे नियोजन केले असले तरी याद्यांचा घोळ समोर येत आहे. सदस्य संतोष देशमुख यांनी ऑनलाईन बैठकीवर आक्षेप घेतला असून न्यायालयात या प्रकरणी दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याद्या जिल्हा नियोजन कार्यालयात देखील नाहीत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी यांनी दिली.