दोषी आढळणार्या वनाधिकारी व कर्मचार्यावर कारवाईचे शासनाचे आदेश
गडचिरोली (Forest Protect) : दिवसेंदिवस पर्यावरणाचा र्हास होत असल्याने जंगलाचे संरक्षण करण्यास अपयशी अधिकारी व कर्मचार्यावर गडांतर येणार आहे. अवैध वृक्षतोड, अवैध लाकूड वाहतूक, वनवणवा, तस्करी यावर आळा घालण्यास कामचुकारपणा करणारे वनाधिकारी व कर्मचार्यावर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
सन १९८८ च्या राष्ट्रीय वनधोरण व सन २००८ च्या महाराष्ट्र वनधोरणानुसार राज्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादीत असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण भौगोलिक क्षेत्र ३,०७,७१२ चौ. कि.मी. असून यातील वनांचे क्षेत्र ६१,९९१,८९ चौ. कि.मी. (अस्थाई) आहे. त्याची भौगोलिक क्षेत्राशी टक्केवारी २०.१५ टक्के आहे. चोरटी वृक्षतोड व वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्याकरिता वनविभागातील प्रत्येक क्षेत्रिय संवर्गाकरिता संरक्षणाच्या बाबी हाताळण्यासाठीr वनसंरक्षणाचे मापदंड निश्चित करण्यात आले आहेत.
राज्याचे वनक्षेत्र आणि वृक्ष आवरण सध्याच्या २० टक्केवरुन ३३ टक्केवर नेण्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन कार्यक्रम सातत्यपूर्ण रितीने राबविणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी तसेच अवैध नियोजन, अंमजबजावणी आणि सनियंत्रणाबाबत तालुका स्तरावर आमदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती गठीत करण्याबाबत ४ जून २०२५ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
पर्यावरण संरक्षण तसेच पर्यावरणाचा र्हास थांबविण्यासाठी मुख्य वनसरंक्षक, वनसंरक्षक (प्रा.) यांनी दोन महिन्यातून किमान एकदा बैठक घेण्यात यावी असे आदेश शासनाने दिले आहेत.
वृक्ष लागवड व (Forest Protect) संगोपन कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी आणि सनियंत्रणाबाबत तालुका स्तरावर दोन महिन्यातून एकदा बैठका घेण्याबाबत दि. ०४ जून २०२५ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर बैठका नियमित आयोजित करण्यात येत आहे किंवा कसे यावर मुख्य वनसरंक्षक,वनसंरक्षक (प्रा.) हे संनियंत्रण ठेवतील. जर अशा प्रकारच्या बैठका घेण्यास जाणून बुजून विलंब होत असल्यास संबंधित अधिकारी,कर्मचारी यांचेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा ईशारा शासनाने दिला आहे.
राज्याच्या जंगलाची मदार गडचिरोल जिल्ह्यावर
गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी ८९ टक्के क्षेत्र हे एकुण वनक्षेत्र असून त्यापैकी ७० टक्के वनक्षेत्र हे घनदाट वनांनी व्यापलेला आहे. एवढे मोठे क्षेत्र जंगलाखाली असणारा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा एकमेव आहे. जिल्ह्याचे २०२०-२१ मधील वनक्षेत्र १२,८९७.७१ चौ.कि.मी. इतके आहे. या वन क्षेत्रापैकी ५१.७८ चौ.कि.मी. क्षेत्र महसूल विभागाचे असून वन विभागाचे १२.१३४.०४ चौ.कि.मी. क्षेत्र आहे. राखीव वनक्षेत्र ११, २२७.१९ चौ.कि.मी., संरक्षित वनक्षेत्र १,४०३.०६ चौ.कि.मी. व अवर्गीकृत क्षेत्र २६७.४६ चौ.कि.मी. क्षेत्र आहे. जिल्ह्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने विचार केला असता वन संपत्तीचा महत्वाचा वाटा आहे. २०२१-२२ या वर्षामधील वनक्षेत्राचे उत्पन्न १ १११.४१ कोटी आहे.


