आखाडा बाळापूर (Hingoli) :- येथे मंगळवारी आठवडी बाजार दिवशी सकाळी अकरा वाजता बोथी येथील वयोवृद्ध महिलेस मोफत साड्या दिल्या जात आहेत असे म्हणून भूलथापा मारून सदर महिलेच्या अंगावरील ५० हजार रूपयाचे दागदागिने लुटणारे दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार रोजी उशिरा अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
मंगळवारी आखाडा बाळापूर बाजारपेठ मराठवाडा चौकात बोथी येथील धुरपताबाई दादाराव वागतकर (७०) या आठवडी बाजारात आल्या असता मोफत साड्या भेटायल्या म्हणून भुलथापा मारत आरोपींनी त्यांच्या अंगावरील जवळपास ५० हजार रूपयाचे सोना चांदीचे दागदागिने लंपास केले होते. सदर प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हा शाखा वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करून काही तासातच सिसीटीव्ही फुटेज माध्यमातून आरोपीचा माग काढला. आरोपी परभणी जिल्ह्यातील असल्याचे समजले असता पथक परभणी (Parbhani) येथे गेल्यावर आरोपी हिंगोली जिल्ह्यात असल्याची व चोंढी येथे त्याचा साथीदार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, विशाल खंडागळे, किशोर सावंत, राजु ठाकूर, दत्ता नागरे, लिंबाजी वाव्हुळे,रवी स्वामी यांचया पथकाने बुधवारी रात्री मोहीम राबवून रामचरण सिताराम काळे (रा.मंगरूळ ता.मानवत) याला पकडले.
नंतर त्याचा साथीदार सुनील सरदारसिंग शिंदे (रा.चोंडी आंबा ता.वसमत) यास पकडले. पोलीस पथकाने आरोपी कडून महिलेचा चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन मोबाईल, धितू कापण्याचे दोन कटर असा ६६ हजार १०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून रात्री उशिरा सदर आरोपी आखाडा बाळापूर पोलिसांकडे सुपुर्द केले.