कारंजा (Washim) :- ढाब्यावर वाढदिवस साजरा करत असताना एका मित्रावर अचानक चाकू (Knife) व काठीने जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील खेर्डा बु. येथे घडली. या घटनेत १२ ते १३ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
१२ ते १३ जणांवर गुन्हा दाखल
कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील फिर्यादी हा खेर्डा गावातील जैस्वाल ढाब्यावर वाढदिवस साजरा करीत असताना त्यावेळी मित्र ऋषिकेश लळे तेथे हजर होता. त्याच्यावर आरोपींनी जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू, लाठ्या, लाकडी फलटी व लाथाबुक्क्यांनी जोरदार हल्ला करुन त्यास गंभीर जखमी केले. याप्रकरणी सचिन पुंडलिकराव खंडागळे (३५, रा.खेर्डा बु. ) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी दिलीप उर्फ बबलु काशिनाथ खाडे (३७), दिनेश उर्फ सोनु डिगांबर खाडे (२२), मनोज डिगांबर खाडे (४६) , डिगांबर खाडे (६०), डीगांबर उर्फ निकेश भोंडे (२६), सारंग खाडे (२५), रोहीत उर्फ दादु खाडे (२२) यांच्यासह इतर पाच ते सहा जण ( सर्व रा. खेर्डा बु.ता.कारंजा) यांच्याविरुद्ध कलम १०९, १८९(२), १८९(४),१९१(२), १९१(३) १९० बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल चव्हाण करीत आहेत.