लातूर(Latur) :- भेगाळलेला लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्ग तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे व दोषींवर कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी इतिहासातील पहिलीच हायवे परिक्रमा काँग्रेसच्यावतीने (Congress)शुक्रवार ((दि.२८) पासून निलंगा तालुक्यातील पानचिंचोली गावापासून सुरू झाली.
दीडशे निष्पाप बळी गेल्याने महामार्ग दुरुस्तीची मागणी
लातूर ते जहिराबाद या निकृष्ट राष्ट्रीय महामार्गावर(National Highway)मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यात दुचाकींची चाके रुतून अपघातांचे प्रमाण अधिक आहे. अशा अपघातांमध्ये जवळपास दीडशे निष्पाप बळी गेले. कायमस्वरूपी अपंगत्व आलेले निष्पाप शेकडो लोक आहेत. बळी नागरिक, युवक यांना स्मरून येणाऱ्या काळात होऊ शकणारे असंख्य अपघात (accident)टाळून जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी हा महामार्ग तात्काळ दुरुस्त होणे आवश्यक आहे. या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी शुक्रवारी निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली लातूर जाहिराबाद हायवे परिक्रमा शुभारंभ निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे झाला.
यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजीत माने, निलंगा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, तालुका कार्याध्यक्ष ॲड. नारायण सोमवंशी, पंकज शेळके, गंगाधर चव्हाण, प्रमोद मरूरे, महेश देशमुख, विठ्ठल पाटील, ॲड. तिरुपती शिंदे, मदन बिरादार, अमोल नवटक्के, बालाजी पाटील, भगवान पाटील, श्रीकांत साळुंके, पिरसाहब सय्यद, बब्रुवान जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.