हिंगोली (Hingoli) :- जिल्ह्यातील काँग्रेस(Congress)पदाधिकार्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा राडा झाला. पक्षाचे हिंगोली शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांनी मारहाण झाल्याची माहिती समाज माध्यमांना दिली. शनिवारी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक माजी आमदार कुणाल चौधरी हिंगोलीत आले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजीराव देशमुख सभागृहात तिन्ही विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक सुरू होती. ही बैठक विधान सभा मतदार संघ (Vidhan Sabha Constituency) निहाय घेतली जात होती.
काँग्रेस हिंगोली शहराध्यक्षाला मारहाण झाल्याचा आरोप
या बैठकीस आ.डॉ.प्रज्ञा सातव, जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हा प्रभारी अॅड.सचिन नाईक, जितेंद्र देहाडे, सुरेश आप्पा सराफ, शामराव जगताप, हिंगोली विधानसभेचे नेते प्रकाशराव थोरात, डॉ.मारोतराव क्यातमवार, महिला जिल्हाध्यक्षा वनिता गुंजकर, संजय उर्फ भैय्या देशमुख, शेख नईम शेख लाल, बापूराव बांगर, विशाल घुगे आदी नेत्यांसहीत विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रारंभी निरीक्षक चौधरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता गटबाजी किंवा शक्तीप्रदर्शन करू नका, पक्षाने दिलेल्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन केले. मार्गदर्शनानंतर मतदार संघ निहाय आढावा घेण्यात येणार असल्याने सभागृहातील ओट्यावर बनविलेल्या मंचावर पक्ष निरीक्षक व प्रमुख पदाधिकारी थांबले. बाकी सर्व कार्यकर्ते खाली प्रेक्षागृहात थांबले. इतक्यात अचानक राडा झाला व हिंगोलीचे शहराध्यक्ष पवन उपाध्याय यांनी आपल्याला मारहाण (Beating)झाल्याचे सांगितले. गोंधळ वाढत असल्याने पक्ष निरीक्षकांनी पुढील कार्यवाही स्थगित करून बैठक आटोपती घेतली. या राड्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांकडे कोणतीही तक्रार झाल्याची माहिती नाही
यानंतर पवन उपाध्याय यांना शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार झाल्याची माहिती नाही. समाज माध्यमांशी बोलताना पवन उपाध्याय यांनी प्रकाश थोरात व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करून मारहाणी दरम्यान खिशातील पैसे व मोबाईलही काढून घेतल्याचे सांगितले. यापूर्वी कनेरगाव नाका येथे पक्षाच्या झालेल्या बैठकीच्या वेळी दोन गटातील कार्यकर्त्यांची हमरी-तुमरी झाली होती. ही घटना घडली त्यावेळी मी पक्ष निरीक्षक कुणाल चौधरी व आ. प्रज्ञा सातव यांच्या समवेत व्यासपिठावर होतो. खाली काय झाले याबाबत मला काहीच माहित नाही, अशा शब्दांत प्रकाश थोरात यांनी स्पष्टोक्ती दिली.