श्रीधर ठाकरे यांची माहिती
देशोन्नती वृत्तसंकलन
आष्टी/शहीद (Oranges Exports) : विदर्भातील संत्री ही पहिल्यांदाच विमानाने विदेशात पोहोचविण्यात यश आले आहे. तब्बल दीड टन संत्र्याची पहिली खेप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरून मस्कत येथे रवाना करण्यात आली असल्याचे महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. यापुढे इतर देशांमध्येसुद्धा हवाई मार्गे संत्र्यांची निर्यात वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
बांगलादेशामध्ये संत्र्याच्या निर्यातीवर (Oranges Exports) परिणाम झाला आहे. त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागपुरी संत्र्याची पहिल्यांदाच विमानाच्या माध्यमातून ओमानची राजधानी मस्कत येथे निर्यात झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्यातदार सोनल लोहारीकर, मनोज जवंजाळ, अमीत जोशी, राहुल ठाकरे यांच्या उपस्थितीत ही पहिली खेप रवाना करण्यात आली असल्याचे श्रीधर ठाकरे यांनी सुतोवाच केले. विमानाने शेतमाल निर्यात ही महाग ठरते. परंतु पहिल्या टप्प्यात बाजारपेठ उपलब्धतेसाठी अशा प्रकारची जोखीम घेणे गरजेचे आहे. मस्कतला संत्रा आवडल्यास त्यांच्याकडून मागणी वाढत नफ्याचे प्रमाणही अधिक होऊ शकते.
येत्या काळात संत्र्यावरील प्रक्रियेला देशांतर्गत प्रोत्साहन देण्यावर भर राहणार असून संत्रा पावडर करून त्याचा वापर संत्रा बर्फी मध्ये केला जाणार आहे. अशा प्रकारच्या प्रक्रियेतून संत्र्याची मागणी वाढेल. (Oranges Exports) संत्रा फळाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे, असे याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपुरी संत्र्याची मस्कत येथे प्रथमच निर्यात होत असल्याबद्दल गडकरी यांनी महाऑरेंज व निर्यातदार सोनाली लोहारीकर यांना शुभेच्छा दिल्या. संत्रा निर्यातीमध्ये महाऑरेंजच्या भूमिकेविषयी श्रीधर ठाकरे यांनी सविस्तर माहिती याप्रसंगी दिली.