कोरची (Gadchiroli):- तालुका मुख्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर कोरची नवरगाव मार्गावर दुचाकीचा अपघात (Accident) झाला सदर अपघातामध्ये दुचाकी चालक रुपेश नैताम (27) चांदगॊटा याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीमध्ये सोबत असलेली मीनाबाई कल्लो (50) नवरगाव यांना डोक्यात मार लागल्यामुळे त्यांची सुद्धा परिस्थिती नाजूक असून महेश कल्लो (25) नवरगाव ला किरकोळ मार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही अपघात ग्रस्त रुग्णांना 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आले.
तीन तास रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे शेवटी नगर पंचायतच्या शव वाहनाने आणण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक रुपेश नैताम हा आपल्या नातेवाईकाच्या लग्नात झगडवाही येथे गेला होता व लग्न समारंभ (Wedding Ceremony) आटोपल्यानंतर मीनाबाई कल्लो व महेश कल्लो यांना दुचाकीने नवरगाव येथे सोडण्याकरिता जात असताना एका जड वाहणाने धडक दिल्यामुळे तिघेही खाली पडले. ज्यामध्ये रुपेश याचा जागीच मृत्यू (Death)झाला. सदर मृतकाला शवविच्छेदनाकरिता (Autopsy) रुग्णालयात नेण्याकरिता ग्रामीण रुग्णालय कोरची यांना रुग्णवाहिकेकरिता(Ambulance) दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी लगेच पाठवीत आहो असे सांगितले परंतु रुग्णालयापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या घटना स्थळात तीन तास रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे शेवटी नगर पंचायतच्या शव वाहनाने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आणण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांना दोनदा संपर्क करण्यात आले, परंतु त्यांनी कॉल घेतले नाही
याबाबतची माहिती विचारण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक (Surgeon)डॉ. खंडाते यांना दोनदा संपर्क करण्यात आले परंतु त्यांनी कॉल घेतले नाही. यामुळे कोरची येथील ग्रामीण रुग्णालय हे वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. याबाबीची सखोल चौकशी करून वैद्यकीय अधीक्षक डॉ. थूल यांच्यावर कार्यवाही कारण्यात यावी. अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे. रुग्णवाहीका ही ग्रामीण रुग्णालय कोरची येथे उपलब्ध असून ती लगेच पाठविण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. थूल यांनी दिली परंतु काही वेळानंतर त्यांना परत संपर्क केले असता त्यांनी कॉल घेतला नाही. याबाबतच कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. विटणकर यांना विचारणा केली असता मी रुग्णवाहीका पाठविण्यासाठी रुग्णवाहिकेच्या उपलब्ध असलेल्या चालकांनी माझी ड्युटी नसून मी जाणार नाही अशा शब्दात मला उत्तर दिले व सदर चालकाने जाण्यास नकार दिल्यामुळे रुग्णावाहिका ही घटना स्थळी पोहचू शकली नाही असे वक्तव्य डॉ. विटणकर यांनी केले.