नवी दिल्ली/मुंबई (One District One Product Award) : ‘एक जिल्हा एक उत्पादन 2024’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. यासह रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत.
भारत मंडपममध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ 2024 पुरस्कार (One District One Product Award) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal), दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांची नाविन्यपूर्णता, उच्च दर्जा आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व प्रस्थापित केले.
महाराष्ट्राची ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमात सुवर्ण कामगिरी
‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (One District One Product Award) हा उपक्रम केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक बाजारपेठेत त्यांचा ठसा उमटवणे आहे. या उपक्रमांतर्गत 2024 च्या पुरस्कार समारंभात महाराष्ट्राने आपली उत्कृष्टता सिद्ध करून विविध श्रेणीत पुरस्कार मिळविले. हे पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास या तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले. परदेशातील भारतीय दूतावासांनी या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. राज्यांच्या ‘अ’ श्रेणीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यांनीही सुवर्णपदक मिळवले आहे. राज्याच्यावतीने उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कृषी क्षेत्रातील महाराष्ट्राचे यश
महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात आघाडी कायम राखत विविध जिल्ह्यांच्या उत्पादनांना मान्यता मिळवली आहे. या (One District One Product Award) अंतर्गत खालील जिल्ह्यांना आपल्या वैशिष्ट्पूर्ण कृषी उत्पादनांसाठी पुरस्कार पटवावले.
रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक
जागतिक स्तरावर विशेष ओळख असलेला रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला आहे. कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आहे. हापूस आंब्याची गोड चव, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हे यश मिळाले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नागपुरी संत्र्यांना रौप्यपदक
नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केले असून नागपूर संत्र्यांनी आपल्या रसाळ चवीने आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेने देश-विदेशात ख्याती मिळवली आहे. या यशामुळे नागपूर जिल्ह्याचा कृषी वारसा आणखी समृद्ध झाला आहे. रौप्यपदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला.
अमरावतीच्या मंदारिन संत्र्यांना कांस्यपदक
अमरावती जिल्ह्याने मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणी अंतर्गत तृतीय स्थान मिळवले. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रयत्न यामुळे अमरावती जिल्ह्याने हे यश संपादन केले. अमरावती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नाशिकच्या द्राक्षे आणि मनुक्यांना विशेष उल्लेख पुरस्कार
नाशिक जिल्ह्याने द्राक्षे आणि मनुक्यांसाठी (ग्रेप्स अँड रेझिन्स) कृषी क्षेत्रातील श्रेणी ‘अ’ अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला. नाशिकच्या द्राक्षांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे आणि या यशाने नाशिकच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला मान्यता मिळाली. हा पुरस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वीकारला.
गैर-कृषी क्षेत्रातील यश
अकोला जिल्ह्याने गैर-कृषी क्षेत्रातील श्रेणीतील ‘ब’ श्रेणी अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला आहे. कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. हा (One District One Product Award) पुरस्कार जिल्हा उद्योग केंद्र, अकोल्याचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी स्वीकारला.