रिसोड (Risod):- हार्वेस्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात(Accident) एकाचा मृत्यू झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8:00 वाजता रिसोड लोणार रस्त्यावरील शेलू खडसे फाट्याजवळ घडली. संजय गणपत गोरे, वय ४८ वर्ष, रा. एकलासपूर ता. रिसोड जि. वाशिम, असे मृतकाचे नाव आहे.
दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि हार्वेस्टरच्या मागील चाकात पडल्याने जागीच मृत्यू
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रिसोड शहरातील सिव्हील लाईन येथील भास्कर गणपत गोरे यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ संजय गणपत गोरे हे घोटा ता. रिसोड येथील लग्नसमारंभ आटोपून एमएच ३७ एसी १५४१ क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या गावी परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि एक मुलगाही होता. रिसोड लोणार रस्त्यावरून सेलू फाट्याकडे जात असताना त्यांचे भाऊ संजय गोरे यांना समोरून येणारा हार्वेस्टर क्रमांक पि बी 34 सी 6856 हा साईड लाईट व हेडलाईट नसल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि हार्वेस्टरच्या मागील चाकात पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृतक संजय गोरे त्यांची पत्नी व मुलगा बचावले. याप्रकरणी पोलिसांनी हार्वेस्टर चालक भोलासिंग सोर्जनसिंग वय ३८, रा. राणीवाला गाव, ता. मोटनोर जिल्हा मुकसम (पंजाब) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा (Crime) दाखल केला असून पुढील तपास पीएसआय डोंगरे करीत आहेत.