कारंजा(Washim):- बनावट लिंक व मोबाईल अॅपवर(Mobile app) गुंतवणूक करून कारंजेकरांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप पर्यंत कोणीही पोलिसात तक्रार(complaint) दाखल केली नाही.
नागरिकांनी दक्षता बाळगावी – ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला
दरम्यान, या संदर्भात नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी केले आहे. अलीकडे प्रत्येकाला श्रीमंतीचा हव्यास जडल्याने प्रत्येक जण झटपट श्रीमंत(rich) होण्याचा मार्ग शोधतो. अशातच शहरात काहींनी एक बनावट लिंक व मोबाईल ॲपवर गुंतवणूक केल्यास दररोज त्याचा परतावा मिळतो, अशी माहिती दिली. त्यामुळे अनेकांनी गुंतवणूक केली. त्या मोबदल्यात त्यांना काही दिवस परतावाही मिळाला. परंतु त्यानंतर मात्र अचानक लिंक आणि अॅप बंद झाल्याने फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला. यात शहरातील धनदांडग्यांनीच नव्हे तर मेहनत मजुरी करणार्यानी देखील आपली कष्टाची कमाई (Hard earned) गमावली. मात्र, ही बनावट लिंक आणि मोबाईल अॅप शहरात कोणी आणले ? आणि गुंतवणूक करण्यास इतरांना कोणी भाग पाडले? यासंदर्भात कोणीही बोलायला तयार नाही. या प्रकरणात घनदांडग्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. परंतु पोलीस चौकशीचा ससेमिरा मागे लागेल या भीतीने धन दांडग्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली नाही तर मजुरांची रक्कम कमी असल्याने त्यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली नाही. फसवणुकीची रक्कम ही जवळपास काही कोटी रुपयांच्या घरात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.