वसमत तालुक्यातील शिरळी शिवारात पिकली खसखस
हिंगोली जिल्ह्यात पहिलीच कारवाई
हिंगोली जिल्ह्यात पहिलीच कारवाई
वसमत (Opium Plants LCB Raid) : तालुक्यातील शिरळी शिवारातील एका शेतात प्रतिबंधित असलेल्या अफूची झाडे (खसखस) लागवड केली असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी छापा मारला या छाप्यात एक क्विंटल 77 किलो वजनाची आफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यात अफू खसखस पिकविण्याची व त्याविरुद्ध कारवाई करण्याची ही पहिलीच घटना आहे.
हिंगोली चे पोलीस अधीक्षक डॉ नीलम रोहन यांनी पदभार घेतल्यापासून अवैधव्यवसाय विरोधात जोरदार मोहीम राबवणे सुरू आहे. (Opium Plants LCB Raid) अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाया होत आहेत सोबतच पिस्तोल, शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात कारवाई व सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्याची मोहीम राबवली आहे यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.
कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील शिरळी भागात प्रतिबंधित असलेली खसखस अफू पिकवली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला लागली. एलसीबी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक कारामुंगे, जमादार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर गोरे, नरेंद्र साळवे, संदीप टाक, साठे यांच्या पथकाने सोमवारी रात्री शिरळी परिसरात शोध मोहीम राबवली असता रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास शिर्डी येथील प्रताप नलगे (रा. सिरली) याच्या शेतात लसूनाच्या पिकात अफूची झाडे लावल्याचे दिसून आले.
तब्बल चार गुंठे जागेत हि झाडे लावली होती. पोलिसांनी सर्व झाडे उपटून त्याचे वजन केले असता सर्व झाडांचे वजन १ क्विंटल ७७ किलो भरले आहे. या अफूची किंमत ३.५४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी प्रताप नलगे याला ताब्यात घेतले आहे. वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ पुढील तपास करीत आहेत.
जिल्ह्यात पहिलाच छापा
हिंगोली जिल्ह्यांमध्ये अफू (खसखस )लागवडीचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे शासनाने प्रतिबंधित केलेले अमली पदार्थ सदृश्य असलेले ताजे ओले हिरवे पाने व फुले बोंडा सहित जप्त करण्यात आले आहेत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा हा अफू (खसखस) अमली पदार्थ असल्याने प्रतिबंधित आहे हिंगोली जिल्हा पोलिसांच्या इतिहासात या प्रकाराची ही पहिलीच कारवाई ठरली आहेयाप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंभ घेवारे यांच्या तक्रारीवरून गुंगीकारक औषधी द्रव्य व मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्रकरणाचा तपास वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ करत आहेत.




